१ जानेवारी २०२५ पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा संशय असलेला व दीडशे पोलिसांना गेले २२ दिवस गुंगारा देणारा वाल्मिक कराड अखेर मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) मुख्यालयात पोलिसांना शरण आला.
कराड हाच देशमुख यांच्या खुनाचा सूत्रधार असल्याचा आरोप स्थानिक राजकीय नेत्यांनी केला आहे.मात्र त्याबाबत पोलिसांनी कराड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. या प्रकरणात राज्यभर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे पोलिसांनी कराड याचा शोध सुरू केला होता.त्याच्याविरुद्ध पवनचक्की कंपनीत दोन कोटी रुपये खंडणी मागण्याचा गुन्हा प्रलंबित आहे. त्या प्रकरणामध्ये त्याची अटक प्रलंबित होती. त्याला त्या गुन्ह्यात अटक करून सहभाग आढळल्यास खुनाच्याही प्रकरणामध्ये आरोप ठेवले जातील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दरम्यान, कराड याने मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून आपण आत्मसमर्पण करत असल्याचे सांगितले.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे माझ्याविरुद्ध खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझ्याविरुद्ध खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अटकपूर्व जामिनाचा मार्ग मोकळा असला, तरी मी ‘सीआयडी’कडे आत्मसमर्पण करत आहे, असे त्याने या व्हिडीओमध्ये नमूद केले आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच प्रसारमाध्यमांनी पाषाण रस्त्यावरील चव्हाणनगरमधील ‘सीआयडी’ कार्यालयाकडे धाव घेतली. या कार्यालयाच्या परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तेथे काही वेळातच पांढऱ्या स्कॉर्पिओमधून वाल्मिक कराड व त्याचे कार्यकर्ते दाखल झाले.
या जीपमध्ये स्थानिक दोन नगरसेवकही होते. पोलिसांच्या पथकाने त्या सर्वांना ताब्यात घेतले. सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरुडे, पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी कराड व त्याच्या सोबतच्या नगरसेवकांची स्वतंत्र दालनात चौकशी केली. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास या सर्वांना घेऊन पोलीस केजकडे रवाना झाले. तेथे रात्री उशिरा कराड याला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.त्याबाबत आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी पूर्ण केली आहे.
मस्साजोग येथील देशमुख खून प्रकरणानंतर वाल्मिक कराड पसार झाला होता. संपूर्ण बीड जिल्ह्याचे पोलीस त्याच्या मागावर होते. तरीही तो पोलिसांच्या हाती न लागल्याने आठवडाभरापूर्वी या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला. या विभागाच्या नऊ पथकांतील सुमारे दीडशे अधिकारी व कर्मचारी त्याचा शोध घेत होते. त्यांना गुंगारा देणाऱ्या कराडने अचानक पोलिसांपुढे शरणागती पत्करल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
व्हायरल व्हिडीओचा ही होणार तपास
वाल्मिक कराड याने मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून आपण पोलिसांपुढे शरणागती पत्करत असल्याचे जाहीर केले. हा व्हिडीओ कोणी चित्रित केला ? तो कोठून प्रसारित करण्यात आला? तो कोणी शेअर केला? याबाबत पोलीस तपास करत आहेत. हा व्हिडीओ कोणी लाईक केला? तो कोठे चित्रित करण्यात आला? त्यावर कोणाच्या कमेंट्स आहेत? याबाबत सायबर तज्ज्ञांमार्फत तांत्रिक विश्लेषण जारी करण्यात आले आहे.
वाल्मिक कराड आला कोठून ?
सीआयडी कार्यालयात हजर होण्यापूर्वी कराड कोठे वास्तव्याला होता? तो बीडहून पुण्यात आला की पुण्यातच त्याने मुक्काम ठोकला होता? त्याने गेले २२ दिवस कोठे दडी मारली होती? त्या काळात त्याच्यासोबत कोणाचे वास्तव्य होते? त्याची या काळात खाण्यापिण्याची व्यवस्था कोणी केली ? तो कोणाची वाहने वापरत होता? या काळात तो कोणाच्या संपर्कात होता? याबाबत पोलिसांनी तपास जारी केला आहे.
शरणागतीपूर्वी जारी केला व्हिडिओ
वाल्मिक कराड याने शरण येण्यापूर्वी एक व्हिडीओ समाजमाध्यमावर पाठवला असून त्यात आपल्याविरुद्ध दाखल असलेला खंडणीचा गुन्हा खोटा असून राजकीय द्वेषामुळे आरोप केले जात आहेत. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जो निष्कर्ष निघेल, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवता मला जी शिक्षा देईल ती मी भोगण्यास तयार आहे,’ असे या व्हिडीओत कराडने म्हटले आहे.
राजकीय ‘मध्यस्थी ‘ची चर्चा
सरपंच संतोष देशमुख यांच्या ९ डिसेंबर २०२४ ला झालेल्या हत्येनंतर राज्यभर एकच गदारोळ झाला. या खून प्रकरणात वाल्मिक कराड याला आरोपी करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. सकल मराठा समाजातर्फे मनोज जरांगे-पाटील यांनीही या मागणीसाठी येत्या २ जानेवारीपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. राजकीय दबावामुळे कराड याला अटक होत नसल्याचे आरोप विविध राजकीय नेत्यांनी वारंवार केले आहेत. राज्यभर उमटलेल्या या तीव्र प्रतिक्रियांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यात सोमवारी बैठक झाली. त्यानंतर २४ तासांतच वाल्मिक कराड पोलिसांकडे शरण आला. त्यामुळे ‘राजकीय मध्यस्थी ने तो पोलिसांकडे हजर झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.