८ फेब्रुवारी २०२५ नाशिक : कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटना पाहता, देशपातळीवर विवाहपूर्व समुपदेशन मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येत आहे.महिला दिनाला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत देशातील पहिले विवाहपूर्व समुपदेशन केंद्र नाशिकमध्ये सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कौटुंबिक हिंसाचार आणि विशाखा समितीची आढावा बैठक रहाटकर यांच्या उपस्थितीत झाली.या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत यासाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र महत्त्वाची भूमिका निभावेल.या ठिकाणी समुपदेशक व अन्य व्यवस्था करण्यात येईल.
हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशपातळीवर अशा प्रकारची केंद्रे सुरू होतील.मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे.नाशिक जिल्ह्यात शासकीय व अशासकीय कार्यालयांमध्ये १० हजार समित्या गठित करण्यात आल्या आहेत. महिला दिनी महिलांची ग्रामसभा गावपातळीवर घेण्याच्या सूचना केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
१० हजार विशाखा समित्यांसंदर्भात निर्णय घेणार
नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुमारे १० हजार विशाखा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, या समित्या केवळ कागदावरच आहेत.त्यांच्या माध्यमातून समुपदेशन करता येईल का, यावरही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.
करुणा मुंडे यांना उशिरा न्याय, तर सामान्यांचे काय ?
कौटुंबिक हिंसाचार प्रकारात मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा यांनी न्यायालयात दाद मागितली.मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांना न्याय मिळाला. मात्र, सामान्य महिलांचे काय ? असा प्रश्न विचारला असता रहाटकर म्हणाल्या की, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात येत आहेत. याचा ताण पोलीस, महिला आयोग, प्रशासन यांसह सर्वांवर आहे. न्यायालयात या प्रकरणांची संख्या मोठी असल्याने निर्णय होण्यास विलंब होतो, असेही विजया रहाटकर यांनी सांगितले.
महिला दिनी प्रत्येक गावात ग्रामसभा
महिला दिनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला ग्रामसभा घेण्यात येणार आहे. ग्रामसभेत बेटी बचाव, बेटी पढाओ योजनेची महिती, कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी समुपदेशनाबाबत निर्णय घेण्यात येतील. मुलगा, मुलगी जन्माला आल्यास त्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी ग्रामसभेवर असेल, अशी माहिती अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.