गावी जायचंय? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा – एसटीच्या हजारो फेऱ्या सुरू

Published on -

महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम जवळ येत असताना प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा वाहतुकीचे नियोजन करत आहे. या वर्षी १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दररोज ७६४ नवीन फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, प्रवाशांना त्यांच्या सुट्टीतील प्रवासाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत परगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते.

या काळात स्थानिक पातळीवरील शटल सेवा आणि जवळच्या अंतराच्या फेऱ्या आगारांमार्फत चालवल्या जातात. मात्र, लांब पल्ल्याच्या बसेसना मागणी वाढल्याने एसटी महामंडळाने शालेय फेऱ्या रद्द करून त्याऐवजी लांब पल्ल्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित केले आहे.

प्रवासी गर्दीच्या मार्गांवर १५ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने या जादा फेऱ्या सुरू होणार असून, मध्यवर्ती कार्यालयाने राज्यातील विविध मार्गांसाठी ७६४ फेऱ्यांना मान्यता दिली आहे. या नियोजनामुळे प्रवाशांना आपल्या मूळ गावी किंवा पर्यटनस्थळी जाण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

या जादा फेऱ्यांचे आरक्षण संगणकीय पद्धतीने करता येणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी एसटी महामंडळाने आपल्या अधिकृत संकेतस्थळांवर (www.msrtc.maharashtra.gov.in आणि npublic.msrtcors.com) तसेच मोबाईल अॅपद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा खुली केली आहे.

याशिवाय, राज्यातील बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध असेल. या सर्वांमुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन अगोदर करून तिकीट बुकिंग सहजपणे करता येईल.

उन्हाळी हंगामातील ही जादा वाहतूक प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, एसटी महामंडळाच्या या प्रयत्नांमुळे सुट्टीतील गर्दी व्यवस्थित हाताळली जाण्याची अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe