सावधान ! पाणी संपत चाललंय…मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे राज्याच्या सहाही विभागांतील धरणांमधील पाणीसाठा अवघा ६६ टक्क्यांवर आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत २१ टक्के जलसाठा कमी आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली असून, उन्हाळ्यापर्यंत तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात जलसंपदा विभागाचे पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोकण असे सहा विभाग आहेत. या विभागांतर्गत २ हजार ५९५ लहान, मोठी धरणे आहेत.

शेती, व्यवसाय उद्योगधंदे या धरणांवर अवलंबून असून, यंदाच्या वर्षी अल निनोचा फटका मान्सूनला बसल्याने राज्यात पावसाला सरासरीदेखील गाठता आली नाही. त्यामुळे धरणे काठोकाठ भरली नाही. परिणामी, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागांमध्ये हिवाळ्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

राज्यातील जलाशयांमध्ये गतवर्षी ८७.१० टक्के पाणीसाठा होता. यंदा अवघा ६६.३१ टक्के पाणीसाठा आहे. त्यापैकी सद्यस्थितीला कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक ८२.६३ टक्के पाणीसाठा आहे, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक कमी ३७.६३ टक्के पाणीसाठा आहे.

तुलनेत गतवर्षी या विभागातील धरणांमध्ये ८७.३१ टक्के पाणीसाठा होता. विदर्भात पावसाने चांगली हजेरी लावली असली, तरी ८१.७८ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागात ७५.६२ टक्के, तर पुणे विभागात ७०.३९ टक्के पाणीसाठा सद्यस्थितीला आहे.

नाशिक विभागात ७०.६१ टक्के पाणीसाठा अशी धरणांची परिस्थिती आहे. उन्हाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार असले, तरी मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.

त्याचबरोबर राज्यातील इतर विभागांमील धरणांमध्ये समाधानकारक पाणीपुरवठा नसल्याने येथील शहरांमध्ये सुरू असणारी विकासकामे, बांधकामे, प्रकल्प, उद्योगधंदे, व्यवसायांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe