नाशिक सह नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना पोलीस बंदोबस्तात जायकवाडीला पाणी सोडणार !

Ahmednagarlive24 office
Updated:
Maharashtra News

Maharashtra News : पुरेशा पावसाअभावी तहानलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक, नगरमधून यंदा ८.६०३ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ३१ ऑक्टोबरपूर्वी हे पाणी सोडणे बंधनकारक आहे.

त्यामुळे मंगळवारी रात्री ११ वाजता पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. त्यात नाशिकमधून ३.१४३ टीएमसी, तर नगर जिल्ह्यातून ५.४६ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा असा जलसंघर्ष

यंदा नाशिकसह नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना जायकवाडीला पाणी सोडले जात असल्यामुळे नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा असा जलसंघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात विदर्भ वगळता अन्यत्र पावसाची अवकृपा झाली. नाशिक जिल्ह्यात अखेरच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली असली तरी बहुतांश तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. यंदा पर्जन्यमानात ४२ टक्के घट झाल्याने जिल्ह्यात भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

नाशिकमधून छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत पुरेसा पाऊस होऊन जायकवाडीचा साठा ६५ टक्के न झाल्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून आता ८.६०३ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.

दुसरीकडे वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आताच घाई करू नये, अशी मागणी नाशिक व नगर जिल्ह्यातून करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात सद्यस्थितीत धरणात ४४ टक्के साठा असून, हा साठा पावसाळ्यात ४७ टक्के होता.

जायकवाडी धरणातून १ सप्टेंबरपासून १८० दशलक्ष घनफूट पाणी २५ दिवसांच्या आवर्तनाद्वारे सोडण्यात आले होते. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा घटला होता. महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण कायदा २००५ मधील तरतुदीनुसार १५ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडीचा साठा ६५ टक्के न झाल्यास नगर व नाशिकमधून पाणी सोडण्याची तरतूद आहे.

धरणे भरण्याची शक्यता कमी

सद्यस्थितीत नगर-नाशिकमधील भंडारदरा, नांदूर मधमेश्वर, भाम, भावली व वालदेवी ही छोटी-मोठी धरणे १०० टक्के भरली आहेत. मात्र, निळवंडे, मुळा, दारणा, मुकणे या धरणांमध्ये ८० ते ९० टक्के पाणी आहे.

पाऊस झाला नाही, तर ही धरणे भरण्याची शक्यता कमी आहे. शहरासाठी नाशिक महापालिकेने गेल्या वर्षीपेक्षा ३०० दलघफू पाणी आरक्षण वाढवून सहा हजार १०० दलघफू पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे.

पाणी नियोजन कोलमडणार

६ ऑक्टोबरला पाणी आरक्षणासंदर्भात बैठक होणार आहे. मराठवाड्याची २०१८ साली १२ टीएमसीची मागणी होती, तेव्हा नियमाने साडेसहा टीएमसी पाणी द्यावे लागले होते. परंतु यंदा नाशिकसह नगर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असताना जायकवाडीला पाणी सोडावे लागत असल्याने पाणी नियोजन कोलमडणार आहे.

धरण                                   समूहाचे नाव                                                                  सोडावयाचे पाणी

नाशिक                             गंगापूर (गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी)                                          ०.५
दारणा                              (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी)               २.६४३
नगर मुळा                         (मांडओहोळ, मुळा)                                                                         २.१०
प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर)                                      ३.३६
एकूण                                                                                                                                  ८.६०३

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe