राजकीय भूकंप कधी होतोय याचीच वाट बघतोय : शरद पवार

२५ जानेवारी २०२५ कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपल्यात बंद दरवाजाआड कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.कोल्हापूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याबद्दल आपली चर्चा झाली असल्याचा खुलासा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खा. शरद पवार यांनी शुक्रवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील राजकीय स्थित्यंतराबद्दल बोलताना राजकीय भूकंप कधी होतो आणि कोण कधी बाहेर पडतात,याची मी वाट बघतोय,अशी टिप्पणी देखील पवार यांनी केली.ज्येष्ठ नेते खा. शरद पवार हे एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.

सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे सातत्याने भाजपचे हिंदुत्व खरे नाही हे सांगताहेत. काल देखील त्यांनी पुन्हा तेच सांगितले.उद्धव ठाकरे यांच्या सभेला अधिक गर्दी होती; कारण लोकांना त्यांचे मत पटत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती,याबाबत आपली सविस्तर चर्चा झाली आहे.ते कोणताही टोकाचा निर्णय घेणार नाहीत,असे स्पष्टीकरण यावेळी पवार यांनी केले.

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे सतत जे काही बोलत आहेत,त्याची नोंद महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी घेतली आहे.शाह यांच्या बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे.त्यांच्या बोलण्यात कोल्हापूरची संस्कृती दिसून येत नसल्याचा टोला पवार यांनी यावेळी शाह यांना लगावला.

मणिपूरमुळे आता बदल होईल, असे आपल्याला अजिबात वाटत नाही. देशातदेखील सध्या काही बदल होणार नाही, असे देखील पवार यांनी स्पष्ट केले. उदय सामंत २० आमदार घेऊन बाहेर पडणार का ? महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का, या प्रश्नावर, मी वाट बघतोय, हे लोक कधी बाहेर पडतात याची,असे उत्तर दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe