कृषि मंत्री असताना पवारांनी काय केले ? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे टीकास्त्र

२५ जानेवारी २०२५ मालेगाव : शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ‘सहकार से समृद्धी’ असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर शेतकरी हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. साखर कारखान्यांना देखील ऊर्जितावस्था प्रदान करून देण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

शरद पवार यांच्या कार्यकाळात साखर कारखाने पूर्णपणे लयास गेले होते, अशी टीका करीत केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकरी हितासाठी कोणकोणते निर्णय घेतले, याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी, असे आव्हानही शाह यांनी दिले.

मालेगाव येथे शुक्रवारी व्यंकटेश्वरा को-ऑप. पॉवर अॅण्ड अॅग्रो प्रोसेसिंग लि., नाशिक या प्रकल्पस्थळी आयोजित सहकार संमेलनाप्रसंगी शाह बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुरलीधर मोहोळ, दादा भसे. जयकमार रावल, चंद्रकांत बावनकुळे, नरहरी झिरवाळ, गिरीश महाजन, आ. दिलीप बोरसे, आ. छगन भुजबळ यांच्यासह महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती, माजी मंत्री डॉ. भारती पवार, डॉ. सुभाष भामरे, विकास महात्मे, डॉ. शिवाजीराव डोळे आदी मान्यवर उपस्थित होते.शाह म्हणाले की,आजवर शेतकरी पारंपरिक शेती करीत होते.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत विकासाला बळ दिले आहे. सेवानिवृत्त जवानांनी उभारलेल्या व्यंकटेश्वरा को-ऑप. पॉवर अॅण्ड अॅग्रो प्रोसेसिंग लि. या कंपनीच्या माध्यमातून शेतकरी व जवान एकत्र होऊन काम करीत आहेत,असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले.यावेळी शाह यांच्या हस्ते बेळगाव येथील काजू प्रोसेसिंग प्रकल्पाचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, शेतकरी आणि सेवानिवृत्त जवानांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रकल्पाला पुरेपूर मदत करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

शाह-भुजबळ यांच्यात हितगुज !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर नाराज असणारे आ. छगन भुजबळ आणि अमित शाह यांच्यातील यावेळची जवळीक लक्षवेधी ठरली.या व्यासपीठावर अन्य मंत्रिगण उपस्थित असताना भुजबळ थेट शाह यांच्या शेजारी स्थानापन्न झाले. इतकेच नाही, तर या उभय नेत्यांमध्ये हितगुजही झाले.भुजबळ यांच्याकडून मालेगाव शहरासह महामार्गाच्या दुतर्फा शाह यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. हे सर्व पाहता, आ. भुजबळ लवकरच भाजपवासी होतील,अशी चर्चा सभास्थळी रंगली होती !

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe