Maharashtra News : मुंबईची शान म्हणून बेस्टच्या ताफ्यातील जुन्या डबलडेकर बसेसची ओळख आहे. जुन्या डबलडेकर बसेसचा लाल रंग, मार्ग व रुट दर्शवणारे ब्लॅक अँड व्हाईट फलक, बसमध्ये मागून चढा अन मागून उतरा,
अशी विविध वैशिष्ट्य असलेल्या एका जुन्या डबलडेकर बसचे जतन करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी सांगितले.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-Ahmednagarlive24.jpg)
मुंबईच्या रस्त्यांवर गेल्या ८६ वर्षांपासून दिमाखात वावरणारी तसेच प्रत्येक मुंबईकरांच्या आठवणींचा एक भाग असलेल्या जुन्या डबलडेकर बसचे जतन करण्यात यावे, अशी मागणी बेस्टप्रेमींनी लावून धरली होती.
बेस्ट उपक्रम, राज्य सरकार आदींकडे बेस्टप्रेमींनी पाठपुरावा सुरू केला. अखेर बेस्ट उपक्रमाने जुन्या डबलडेकर बसचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा स्वागतार्ह निर्णय असल्याचे बेस्टप्रेमींनी म्हटले आहे.
■ बेस्ट उपक्रमाच्या जुन्या डबलडेकर बसला ऐतिहासिक ओळख आहे. ८ डिसेंबर १९३७ साली पहिली दुमजली बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली होती.
■ देशभरात केवळ मुंबईच्या रस्त्यांवरून डबलडेकर बसेस धावतात. मुंबईची शान म्हणून या बसला नेहमीच मुंबईकरांची गर्दी असते.
■ गेल्या १५ सप्टेंबर रोजी रात्री अंधेरी आगारातील ही जुन्या डबलडेकर बसने, आगरकर चौक ते सिप्स या ४१५ क्रमांकाच्या मार्गावर धावली व याच दिवशी रात्री अखेरचा निरोप घेतला.