Maharashtra News : गेल्या वर्षीचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला होता. तसाच यंदाही शिवाजी पार्कातच दसरा मेळावा होईल, असा विश्वास शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या हयातीत कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नेमणूक झाली आहे. यामुळे खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे, असेही त्यांनी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा करणाऱ्यांना ठणकावले आहे.
शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना ( शिंदे) यांनी दादरच्या जी-नॉर्थ विभागात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दोन्ही शिवसेनेत जुंपण्याची शक्यता आहे.
राऊत यांनी यावर भूमिका मांडताना शिवसेनेचा (ठाकरे) यंदाही शिवाजी पार्कातच दसरा मेळावा होईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखावा, असे आवाहनही त्यांनी शिंदे गटावर टीका करताना केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या संपूर्ण कार्यकारिणीने उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे.
आम्ही फुटलेलो नाही. ते फुटले आहेत. दिल्लीत त्यांची सत्ता आहे. महाराष्ट्रात सत्ता आहे. निवडणूक आयोग आहे म्हणून काहीही मनमानी कराल. हे इथे चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अपात्रतेच्या निर्णयावर वेळकाढूपणा करत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना पळ काढत घानाला निघाले होते. तेथे लोकशाहीवर भाषण देणार होते.
येथे महाराष्ट्रात लोकशाही वाचवणे त्यांच्या हातात आहे, परंतु ते वेळ काढत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जुमानत नाहीत. त्यामुळे आम्ही प्रखर भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी दौरा रद्द केल्याचे समजते, असेही राऊत म्हणाले.