CM Eknath Shinde : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उत्तर देताना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
तसेच इतरांना गद्दार म्हणणाऱ्यांना महाराष्ट्रात खरा गद्दार कोण? हे दाखवण्याची वेळ आल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक असून केवळ मनातील खदखद व्यक्त केल्याची टीका करत सभात्याग केला.
![Loksabha Elections](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-100.jpg)
राज्यात सरकारच्या वतीने अनेक योजना सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने थांबवलेले सर्व प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू झाले. गेल्या अडीच वर्षांमध्ये थांबलेला विकास आता वेगाने सुरू आहे.
मागील वर्षभरात राज्यात एक लाख १८ हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरावर दिली.
महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता. आता तो पहिल्या क्रमांकावर आला आहे. पूर्वी दावोस येथील परिषदेत किती सामंजस्य करार झाले, याची माहिती नाही.
मात्र आम्ही एक लाख ३७ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. परराज्यात उद्योग गेल्याचा टाहो फोडणाऱ्यांना उद्योगाने श्वेतपत्रिका काढून उत्तर दिले. हे सरकार धाडसी आणि रस्त्यावर उतरणारे आहे. फेसबुक लाईव्ह किंवा घरी बसून काम करणारे नाही, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. पंतप्रधान जगात अतिशय ताकदवान व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. भारताची अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावर होती. ती आता पाचव्या क्रमांकावर आली आहे.
तिला तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. तो नक्की पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात अनेक गोष्टींचा दर्जा घसरला होता. शिक्षणासह आरोग्याचा दर्जाही घसरला. आता सर्व बाबतीत राज्य सरकार प्रगतिशील असल्याचे ते म्हणाले.