Aurangzebs Tomb | खुलताबादमधील औरंगजेबाची कबर नेमकी कुणाच्या मालकीची?, वक्फ बोर्डाचा धक्कादायक दावा

छावा या चित्रपटानंतर महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये असलेली औरंगजेबाची कबर पुन्हा चर्चेत आली आहे. मागे ही कबर हटवण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. अशात प्रश्न पडतो की ही कबर नेमकी कुणाच्या मालकीची?, तर याबाबत एक महत्वाचा खुलासा समोर आला आहे.

Published on -

Aurangzebs Tomb | छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. मुघल बादशहा औरंगजेबाच्या कबरीबाबत सध्या महाराष्ट्रात मोठा वाद सुरू असून, काही गट ती कबर हटवण्याची मागणी करत आहेत. छावा चित्रपटानंतर औरंगजेबविरोधातील भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगजेबाची कबर नेमकी कुणाच्या मालकीची आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता मात्र वक्फ बोर्डाच्या नावावर ही जमीन असल्याचा दावा करण्यात आला आहे.

औरंगजेब कबर कुणाच्या मालकीची?

औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथील खुलताबाद येथे आहे. इथल्या शेख झैनुद्दीन दर्ग्याच्या आवारात ही साधी कबर आहे. इतिहासकार सांगतात की औरंगजेबाच्या इच्छेनुसार ही कबर बांधण्यात आली होती. त्याच्या मृत्यूपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की ही कबर फारशी भव्य नसावी आणि त्यासाठी केवळ 14 रुपये 12 आणे खर्च व्हावा. मृत्यूनंतर त्याचा मुलगा आझम शाह याने ही कबर बांधली.

मुघल वंशज प्रिन्स याकूब यांचं पत्र-

आता याच कबरीबाबत नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे कारण मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून कबरीचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या पत्रात म्हटले आहे की ही कबर वक्फ बोर्डाच्या मालकीची असून, भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. त्यामुळे ही कबर हटवण्याचा कोणताही निर्णय चुकीचा ठरेल.

टुसी यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेब भारतात जन्मला आणि भारतातच मरण पावला. त्यामुळे भारतीय संविधानानुसार त्याला येथे दफन करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर ते असेही म्हणतात की, काही लोक इतिहासाची मोडतोड करत असून, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या खुलताबाद येथील दर्ग्यामध्ये औरंगजेबासह इतर मुघल शासक व हैदराबादच्या निजामांच्या कबरीही आहेत. हे संपूर्ण ठिकाण भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली असल्यामुळे त्यावर थेट कोणतीही कारवाई करता येणार नाही. तरीही काही संघटनांनी ती कबर हटवावी अशी मागणी केल्याने या मुद्द्यावरुन राज्यात वाद पेटला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe