Loksabha Elections : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट व भाजपच्या स्थानिक आमदार, नेते, मंत्री व कार्यकत्यामधील वाद चांगलाच रंगल्याचे चित्र आहे. त्यावरून कल्याण लोकसभेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार? याची चर्चा सुरू झाली असून हा वाद आता कळीचा मुद्दा झाला आहे.
हा वाद आणखी वाढू नये, म्हणून शिवसेनेने याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, अशी सारवासारवीची भूमिका घेतली. तर भाजपनेदेखील डॉ. श्रीकांत शिंदे हे एनडीएचे उमेदवार असतील, असे सांगत एक पाऊस मागे घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही ठाणे आणि कल्याण लोकसभेची जागा युतीमध्ये कोण लढणार? प्रश्न कायम आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गट राज्यात आणि केंद्रात सत्तेत एकत्र नांदत असला तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या गटाच्या कार्यकत्यांचे अजूनही खऱ्या अर्थाने मनोमीलन झालेले नाही.
दोन्ही पक्षांतील कार्यकत्यांची अधूनमधून धुसफूस सुरूच असते, अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड असलेल्या ठाण्यात आणि त्यांचे पुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातदेखील दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमधील स्वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये दोन्ही पक्षांतील धुसफूस आणि वादाच्या अनेक घटना चव्हाट्यावरही आल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनापासून एकमेकांचे काम करतील ? याबाबत शंका घेतली जात आहे.
२०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपने केंद्रातील मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र हे शिवसेनेचे खासदार असतानादेखील भाजपने या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर सोपवली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनादेखील उतरवू शकते, याची चर्चा सुरू झाली. वास्तविक, लोकसभेचा जुना ठाणे लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी भाजपकडे होता.
१९९० नंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढल्यानंतर शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी युतीच्या जागा वाटपात ठाणे मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली व ती शिवसेनेकडे खेचून आणली. एवढेच नाही तर त्या जागेवर प्रकाश परांजपे यांच्यासारखा अभ्यासू नगरसेवकाला निवडून आणून खासदार करण्याची किमया केली.
ठाणे लोकसभा मतदारसंघ आपल्याकडून गेल्याचे शल्य आजही भाजपला बोचत आहे. २००४ मध्ये लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पुनरर्चना झाली. जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ठाणे आणि कल्याण असे दोन मतदारसंघ झाले.
त्यावेळी दोन पैकी एकमतदारसंघ भाजपला मिळेल, अशी आशा होती. मात्र दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे राहिले व तेथून शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत.ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजन विचारे हे खासदार आहेत. यावर आता भाजप दावा करण्याची शक्यता आहे.