राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कोट्यातील एक मंत्रिपद सध्या रिक्त आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले असून, त्या जागी आ. संग्राम जगताप यांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली आहे.
आ. संग्राम जगताप हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांचे जनसंपर्क आणि संघटन कौशल्य मजबूत असून, ते स्थानिक तसेच जिल्हा पातळीवर प्रभावी भूमिका बजावत आले आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे पक्षाने त्यांना मंत्रिपदासाठी योग्य उमेदवार म्हणून पुढे करावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांमधून केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. बैठकीला पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत महिला आघाडीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा देखील करण्यात आली. बैठकीत मंत्रिपदासाठी संग्राम जगताप यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळातील हे रिक्त स्थान कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक नेते आहेत, मात्र संग्राम जगताप यांचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्तारात हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
आ. संग्राम जगताप यांना मंत्रिपद दिल्यास नगर जिल्ह्याला मजबूत नेतृत्व मिळेल. त्यांच्या निवडीवर अजित पवार आणि पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार आणि कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार, याबाबत लवकरच अधिकृत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान महिला आघाडीच्या नव्या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी आशा निंबाळकर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षा म्हणून सुजाता कदम, स्मिता वाल्हेकर आणि संगीता ससे यांची नियुक्ती करण्यात आली. नगर तालुका उपाध्यक्षा म्हणून स्नेहल दरंदले,
तर जिल्हा सरचिटणीसपदी वनिता ठोंबे, कल्याणी गाडळकर आणि रोहिणी दळवी यांची निवड करण्यात आली. आश्विनी दळवी यांना कोषाध्यक्षा पद देण्यात आले. तसेच सचिव, सहसचिव, जिल्हा चिटणीस आणि इतर पदांवर देखील नेमणुका करण्यात आल्या.