Birds Fly in a V Formation | जगभरात सुमारे 9,000 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती असून, यापैकी 1,000 हून अधिक फक्त भारतात आढळतात. हे पक्षी विशेषतः स्थलांतर करताना किंवा लांबच्या प्रवासासाठी एकत्र उडतात. त्यांचं हे V आकारातील उड्डाण म्हणजे सहकार्य, शिस्त आणि ऊर्जा वाचवण्याचं उत्तम उदाहरण आहे.
हवा कापून चालतं पक्षांचं टीमवर्क
पक्षांचे V आकारात उडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे हवामानशास्त्र आणि एरोडायनामिक्स. जेव्हा एक पक्षी हवेतून उडतो, तेव्हा तो आपल्या पंखांनी हवेचा एक विशिष्ट प्रवाह तयार करतो. त्यामुळं मागे उडणाऱ्या पक्ष्याला कमी उर्जा वापरून जास्त अंतर पार करता येतं. अशा पद्धतीनं सर्व पक्ष्यांना एकमेकांच्या हवाप्रवाहाचा फायदा होतो.

लंडन वेटरनरी कॉलेजचे प्रोफेसर James Usherwood यांच्या मते, V आकारात उडल्याने हवेचा दाब योग्य प्रमाणात नियंत्रणात राहतो आणि कोणत्याही पक्ष्याला एकमेकांना धडक बसत नाही. शिवाय, समुहात नेतृत्व करणारा पक्षी मधूनच मागे जातो आणि दुसरा पक्षी पुढे येतो. ही सहकार्याची भावना पक्ष्यांमध्ये अगदी नैसर्गिक असते.
अधिक अंतर पार करण्यासाठी विशेष पद्धत-
या समुहात जो पहिल्यांदा उडायला लागतो, तो आघाडी घेतो. एकदा तो थकला की, मागचा पक्षी त्याची जागा घेतो आणि प्रवास पुढे सुरू राहतो. अशा रीतीने संपूर्ण थवा समन्वयाने कार्य करतो.
या प्रकारच्या उड्डाणामुळे पक्ष्यांचे पंख एकमेकांवर आदळत नाहीत, त्यामुळे त्यांची शारीरिक ऊर्जा वाचते आणि ते अधिक अंतर पार करू शकतात. म्हणूनच, V आकारात उडणं ही पक्ष्यांसाठी सर्वाधिक फायदेशीर पद्धत मानली जाते.