Milk Rate : दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्या, पशु खाद्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी तातडीने कमी करा, दूध भेसळ नियंत्रण समितीचा स्पॉट पंचनामा इन कॅमेरा करावा, यासह इतर मागण्यांसंदर्भात राहाता येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना निवेदन दिले असून
मागण्यांबाबत दोन दिवसांत निर्णय न झाल्यास शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणू, असा इशारा दूध उत्पादकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दूग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवार दि. २० नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील अपर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
![Milk Rate](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/11/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-11-21T174505.811.jpg)
निवेदनात म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना जगण्याचा एकमेव मार्ग आहे. चाऱ्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
शासनाने दुधाला ठरवून दिलेल्या प्रतिलिटर ३४ रुपये दरापेक्षाही अतिशय कमी भाव चिलिंग प्लांट व दूध सेंटर चालक तांत्रिक बाबीचा आधार घेऊन देत आहेत. हमी भावापेक्षाही कमी २५ ते २६ रुपये प्रतिलिटर दुधाला मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
दुग्धजन्य पदार्थांचे भाव ८० ते १०० रुपये आहेत, असे असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांचे भाव का पाडतात? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दूध उत्पादन खर्च हा प्रतिलिटर ३५ ते ४० रुपये येत आहे.
त्यामुळे शासनाने किमान दुधाला ५० रुपये प्रतिलिटर भाव तातडीने द्यावा, त्याचबरोबर पशुखाद्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी तातडीने कमी करावे, जनावरांसाठी लागणारे औषधे व कच्च्या मालावरील जीएसटी रद्द करण्यात यावा, दुधाची गुणवत्ता अर्थात मानांकन ३.३ व एसएनएफ ८ पर्यंत करण्यात यावे,
भेसळ नियंत्रण समितीचा स्पॉट पंचनामा इन कॅमेरा करावा, तसेच अहवाल व दूध प्लांटवरील दुग्धजन्य पदार्थांची आवक जावक दर संदर्भातील माहिती १० दिवसाला सार्वजनिक करण्यात यावी,
दुधावरील भेसळ नियंत्रण १०० टक्के करण्यात यावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. दोन दिवसांच्या आत निर्णय घेतला नाही, तर दि. २३ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर अनिल बोठे, योगेश बोठे, भास्कर मोटकर, संजय घोडेकर, बाळासाहेब झिंजाड, कैलास सदाफळ, दीपक सोमासे, राजेंद्र बावके, मीनानाथ पाचरणे, प्रशांत टुपके, राजेंद्र कार्ले, आबासाहेब तुपे, नितीन सदाफळ, विजय दगडू सदाफळ, महेश गेनूजी गाडेकर, विठ्ठलराव कचरू शेळके व अनिल गोपीनाथ बोठे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.