धनंजय मुंडेंचे मंत्रीपद कायम राहणार ? अजित पवार-मुंडेंमध्ये तासभर खलबते; दोषी आढळले तरच कारवाईचे संकेत

Mahesh Waghmare
Published:

७ जानेवारी २०२५ मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदास तूर्तास कोणताही धोका नसल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांचे म्हणणे आहे.देशमुख हत्येप्रकरणी मंत्री मुंडे यांच्याविरोधात जोपर्यंत पुरावे आढळत नाहीत,सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीचे अहवाल येत नाहीत आणि त्यात मुंडेंना दोषी ठरवत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही.

जर यात दोषी आढळल्यास निश्चित कारवाई केली जाईल,अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याची माहिती आहे.त्यामुळे मुंडे यांना तूर्तास तरी अभय मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

बीडमधील देशमुख हत्येप्रकरणी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे.देशमुख यांच्या हत्येसाठी मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध असल्याचा आरोप आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बीडमधील खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांच्यासह सत्ताधारी भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

दरम्यान, विरोधकांकडून हा विषय लावून धरण्याचे संकेत मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना बोलावून घेऊन मागील काही दिवसांपासूनचा घटनाक्रम समजून घेतला. मुंडे यांनी अजित पवारांकडे आपली भूमिका मांडल्याची माहिती आहे.

वाल्मिक कराड याच्याशी माझे पहिल्यापासूनच संबंध आहेत, पण त्याचाही थेट देशमुख हत्येशी काही संबंध नाही. विरोधक मला व आपल्या पक्षाला बदनाम करण्यासाठी या गोष्टीचा फायदा घेऊ इच्छित आहेत.यात सत्ताधारी आमदारांचेही काही हितसंबंध आहेत.

त्यामुळे माझे राजकीय करिअर संपवण्यासाठी माझ्याविरोधात सत्तेतील काही लोकांसह विरोधकांनी षडयंत्र रचले आहे, अशी भूमिका मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे मांडल्याचे सांगण्यात आले.

यावर अजित पवार यांनीही विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडण्याचे कारण नाही. जोपर्यंत तपास यंत्रणा या प्रकरणात कोणाला दोषी धरत नाहीत तोपर्यंत मुंडे यांचा राजीनामा घेण्याचे कोणतेही कारण नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याचे सांगण्यात आले.

सुरेश धस फडणवीस यांच्यात सविस्तर चर्चा

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची सोमवारी सायंकाळी तासभर मंत्रालयात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण लावून धरणारे सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांना सह्याद्रीवर बोलवून चर्चा केली. यादरम्यान, फडणवीस यांनी धस यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते.

देशमुख हत्या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास केला जाईल.यात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव असण्याचा प्रश्नच राहणार नाही.आता या प्रकरणात विरोधकांनी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे.त्यापासून दूर राहावे तसेच माध्यमे व सार्वजनिक ठिकाणी बोलताना संयम बाळगावा,अशा सूचना केल्याचे समजते.

अजित पवार-फडणवीस यांच्यात चर्चा

देशमुख हत्या प्रकरण विरोधकांनी लावून धरल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध झाले असून, त्यांनी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात होत आहे. यावेळी सर्व मंत्री बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे. यावेळी सध्या देशमुख हत्येप्रकरणी माध्यमांत आणि राज्यात जे काही सुरू आहे त्याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारची म्हणून जी काही भूमिका असेल ती फडणवीस किंवा अजित पवार मांडू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe