आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : ना. विखे

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची भूमिका आहे. यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना समाजाला मिळालेले आरक्षण पुन्हा प्रस्तापित होणे, हाच सरकारचा प्रयत्न आहे.

आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही; परंतु आता समाजातील तरुणांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याला समाजाने बळी पडू नये, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

जालना येथील घडलेल्या घटनेबाबत आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, की या घटनेचे समर्थन मुळीच नाही, या घटनेबाबत सरकारने चौकशीचे आदेश दिलेले आहेत. दोषींवर निश्चित कारवाई होईल.

केवळ आता आरक्षणाच्या प्रश्नावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, राज्यात मुख्यमंत्री पदावर असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले होते;

मात्र मागील अडीच वर्षे राज्यात आघाडी सरकार सत्तेवर होते. आरक्षणाच्या मुद्यावर या सरकारने गंभिरतेने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळेच मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण गमवावे लागले. हेसुध्दा दुर्लक्षित करुन चालणार नाही. मागच्या सरकारमुळे गेलेले आरक्षण पुन्हा प्रस्तापित करण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले असून, समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही सरकारची भूमिका आहे.

आरक्षण मिळविण्यासाठी सरकारची भावना अतिशय गंभीर आणि प्रामाणिक आहे. त्यामुळे समाजबांधवांनी शातंता राखण्याचे आवाहन करून, विरोधकांकडून होत असलेल्या बुद्धीभेदाला बळी पडू नये, असेही त्यांनी सुचित केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe