राज्यात महायुती म्हणून सत्तेत असलेले तिन्ही पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मिळून लढणार आहेत. यात लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागांवर निवडून येऊ, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटावर बोलण्याचे टाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, येणारी प्रत्येक निवडणूक महायुती मिळून लढवेल.
लोकसभा आणि विधानसभा आम्ही तिन्ही पक्ष मिळून लढणार आहोत. गेल्या काही काळात महायुतीने घेतलेले निर्णय, काम आणि सर्वसामान्यांना मिळवून दिलेला न्याय याची पोचपावती राज्यातील जनता आम्हाला देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांत झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात बोलताना त्यांनी राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे सांगून पंचनामे युद्धपातळीवर सुरू झाल्याचे सांगून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल,
अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे राज्याच्या विविध भागांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. २ हेक्टर ते ३ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातून पिकांच्या प्राप्त नुकसानीचे अहवाल एकत्र आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात येईल, असेही त्यांनी सागितले.