कोल्हापूर- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना बँकेकडून ३० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, ‘ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना’ या अंतर्गत १ लाख ३८ हजार १५८ महिलांना फक्त १० टक्के व्याजदराने हे कर्ज दिले जाणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून गरजू, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दैनंदिन व्यवहारांसाठी सावकारी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून मोठ्या व्याजदराने कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक पिळवणूक होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महिलांना स्वस्त आणि सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे.
लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेत पात्र असाव्यात आणि त्यांचे पैसे जिल्हा बँकेत जमा होणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यासाठी त्या महिलांना दोन जामीनदारांची आवश्यकता आहे. हे जामीनदारही ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी असणे गरजेचे आहे. कर्जाची मुदत समाप्त झाल्यानंतर त्याचे नूतनीकरण करता येणार नाही. महिला कर्जदारांनी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार जिल्हा बँकेमार्फत करणे आवश्यक आहे. कर्जदार आणि जामीनदार या दोघींनीही बँकेचे ‘ब’ वर्ग सभासद असणे बंधनकारक आहे.
कर्ज परतफेड आणि व्याजदराचे स्वरूप
कर्जमर्यादा: ३०,००० रुपये
परतफेडीची मुदत: ३ वर्षे
व्याजदर: १०%
मासिक हप्ता: ९६८ रुपये
केवळ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठीच नव्हे, तर बचत गटातील महिलांना देखील आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी बँकेने आणखी एक योजना तयार केली आहे. ‘जीएलजी’ समूहातील महिला सदस्यांना ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार असून, हे कर्ज त्या व्यवसायासाठी वापरू शकतील.
महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ब्यूटी पार्लर, शिलाई मशीन, शेवया मशीन, छोटी गिरणी यांसारखी उपयुक्त साधने खरेदी करण्यासाठी हे कर्ज मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, गरीब व कष्टकरी महिलांना आर्थिक आधार मिळावा आणि सावकारी तावडीतून सुटका व्हावी, यासाठी बँकेने ही योजना आणली आहे. जिल्ह्यातील सर्व गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या कर्ज योजनेमुळे हजारो महिलांना नव्या आर्थिक संधी उपलब्ध होणार असून, त्यांना स्वावलंबी होण्यास मदत मिळणार आहे.