अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- महाराष्ट्र राज्य सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला होता.
आता याबाबत अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. सप्टेंबर मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार आता या निर्णयाची काही ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येत असून, सगळीकडे प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिले आहेत.
दरम्यान नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्यूटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती.
त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस, अमरावती आणि नुकतीच नवी मुंबई पोलिसांनीही या निर्णयाची अंमलबजावणी केली. अखेर राज्य पातळीवर निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील महिला पोलिसांना ८ तासांची ड्यूटी करायला मिळणार आहे.
का घेण्यात आला हा निर्णय? हि आहेत प्रमुख कारणे :-पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांवर कामाबरोबरच कौटुंबीक जबाबदारीचा भारही आहे.
सण-उत्सव बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा १२ तासांपेक्षा जास्त वेळ कर्तव्य बजावतात.
त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे मानसिक ताण वाढत आहे.
काही महिला पोलिसांनीही ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती.
त्यानुसार, सगळीकडे पुढील आदेश मिळेपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर यांची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम