Low Price Multibagger Stock:- शेअर बाजारात शुक्रवारी एक सकारात्मक घडामोड घडली, ज्याने छोट्या गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं. कमी किमतीच्या शेअर्समध्ये मोठा परतावा मिळवून देणाऱ्या फोकस बिझनेस सोल्युशन लिमिटेड या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचं नवं गिफ्ट जाहीर केलं. हे पाहता, ज्यांनी अलिकडच्या काळात या शेअरवर विश्वास ठेवला, त्यांना आता त्याचं भरघोस फळ मिळताना दिसत आहे.
मिळतील ५० शेअर्सवर २९ बोनस शेअर्स
फोकस बिझनेस सोल्युशन लिमिटेडनं ५० शेअर्सवर २९ बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला असून, ही कंपनीची दुसरी बोनस घोषणा आहे. यापूर्वी २०२३ मध्येही तिनं गुंतवणूकदारांना ५ शेअर्सवर ४ बोनस शेअर्स दिले होते. सध्या जाहीर केलेल्या बोनसचे प्रमाण २९:५० इतकं आहे. कंपनीनं हे जाहीर केलं असलं, तरी रेकॉर्ड डेट अद्याप ठरवलेली नाही. मात्र, पुढील दोन महिन्यांत हे सगळं अधिकृतरित्या निश्चित होईल, असं संकेत कंपनीकडून मिळाले आहेत.

बोनस शेअरची ही घोषणा जाहीर होताच, शुक्रवारी या शेअरमध्ये चांगलीच उलथापालथ झाली. व्यवहार संपताना फोकस बिझनेसचा शेअर १३५ रुपयांवर स्थिरावला, आणि दिवसभरात तब्बल ३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. हा आकडा कंपनीच्या गेल्या ५२ आठवड्यांतील सर्वोच्च पातळीचा आहे. विशेष म्हणजे या शेअरची नीचांकी किंमत फक्त ५९.५७ रुपये होती.म्हणजेच, कमी वेळात यानं दुप्पटीपेक्षा जास्त वाढ दाखवली आहे.
या कंपनीचा बाजारातील परतावा कसा?
बाजारातील परताव्याच्या तुलनेत पाहिलं, तर फोकस बिझनेस सोल्युशन लिमिटेडनं इतर बड्या कंपन्यांनाही मागं टाकलं आहे. गेल्या फक्त तीन महिन्यांत या शेअरनं ६६ टक्के परतावा दिला आहे आणि जर कोणी या शेअरमध्ये वर्षभर टिकून राहिलं, तर त्याला तब्बल १०४ टक्के नफा मिळालाय. याच काळात, सेन्सेक्स केवळ ६ टक्क्यांनी वाढला होता. या कंपनीनं शेवटच्या तीन वर्षांतही जबरदस्त प्रगती केली असून एकूण वाढ तब्बल ७५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
इतकंच नाही, तर कंपनीनं नियमित लाभांश देण्याची परंपरा देखील राखली आहे. २०२२ मध्ये ३८ पैसे आणि २०२४ मध्ये १० पैसे प्रति शेअर एवढा लाभांश दिला गेला आहे. त्यामुळे ही कंपनी केवळ शेअरच्या किमतीनं नव्हे, तर इतर प्रकारांनीही गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देत आहे.