सातव्या वेतन आयोगासह १७ मागण्यांसाठी मनपा कर्मचारी मंत्रालयापर्यंत….

Ahmednagarlive24 office
Published:

7th Pay Commission : महापालिकेचे कर्मचारी सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी थेट मंत्रालयावर धडक देणार असून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबरला मनपा कर्मचाऱ्यांचा नगर ते मुंबई लाँग मार्च निघणार आहे.

महापालिकेसमोर गुरुवारी (दि. ३१) सकाळी झालेल्या द्वार सभेत या लॉंग मार्च आंदोलनाची घोषणा करण्यात आली. सातवा वेतन आयोग व सफाई कामगारांना लाड बर्वे समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी येत्या ५ सप्टेंबरला मनपासमोर लाक्षणिक सत्याग्रहही करण्यात येणार आहे.

नगर मनपाचा आस्थापना खर्च ७० टक्क्यांवर असून, तो ३५ ते ४० टक्केपर्यंत खाली येत नसल्याने नवीन नोकर भरती व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही.

या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मनपांचा आस्थापना खर्च शासन निकषापेक्षा जास्त असतानाही त्या महापालिकांतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे व त्यानुसार तेथील कर्मचाऱ्यांना वाढीव पगारही मिळत आहे.

पण हा निकष नगर मनपाला लावला जात नसल्याचे म्हणणे मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदा वायकर यांचे आहे. नगर मनपाचा प्रशासकीय खर्च जरी जास्त असला तरी त्या तुलनेत मनपाचे उत्पन्न वाढवण्याची तयारी मनपा प्रशासनाची आहे व त्यानुसार कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत व भविष्यात कोणत्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत, याचा सविस्तर अहवाल मनपा प्रशासनाने सहा महिन्यापूर्वीच शासनाला पाठवला आहे.

मात्र, यावर अद्याप शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ येत्या ५ सप्टेंबरला मनपासमोर लाक्षणिक सत्याग्रह व २ ऑक्टोबरला मनपापासून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढण्यात येणार आहे, असे लोखंडे व वायकर यांनी सांगितले.

राज्यातील सर्व मनपा व नगरपालिकांतील कामगार-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग राज्य सरकारने लागू केला आहे. त्यानुसार या वेतन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली आहे. पण नगर मनपाबाबत मात्र शासनाची भूमिका भेदभावाची आहे, असा दावा मनपा कामगार संघटनेचा आहे.

या लाँग मार्चद्वारे सातव्या वेतन आयोग व लाड – बर्वे आयोगाच्या शिफारशींसह १७ मागण्या केल्या आहेत. कर्मचाऱ्यांची पदोन्नती, मानधनावर काम करणाऱ्यांना मनपा सेवेत सामावून घेणे तसेच कोरोनात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे सहायता अनुदान देण्यास दिरंगाई थांबवण्यात यावी, अशा अन्य मागण्या केल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe