वयाच्या 18 व्या वर्षी ‘या’ तरुणाने दोन शेळ्या घेऊन सुरू केला शेळीपालन व्यवसाय! आज वार्षिक कमवतो 5 ते 6 लाख रुपयांचा नफा

Published on -

Goat Rearing Business: कुठलाही व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल किंवा यशाच्या शिखरावर न्यायचा असेल तर अगदी मोठ्या स्वरूपात सुरुवात करून काही फायदा होत नाही. उलट कुठल्याही व्यवसायाची सुरुवात जर तुम्ही छोट्या स्वरूपामध्ये केली आणि कालांतराने योग्य नियोजन आणि व्यवस्थापन ठेवून टप्प्याटप्प्याने जर व्यवसाय वाढवत गेले तर नक्कीच या माध्यमातून चांगला फायदा मिळतो.

तसेच कमीत कमी भांडवल देखील लागते व जोखीम देखील कमी असते. आता याच मुद्द्याला धरून जर आपण बीड जिल्ह्यातील हनुमान सुलक्षणे या तरुण शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने वयाच्या अठराव्या वर्षी दोन शेळ्या विकत घेऊन व्यवसायाला सुरुवात केली व आज याच व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला पाच ते सहा लाख रुपयांचा नफा मिळवण्यात ते यशस्वी झालेले आहेत. या यशामागे नक्कीच त्यांचे प्रयत्न तसेच कष्ट व योग्य नियोजन आहे यात शंकाच नाही.

शेळीपालनातून हनुमान सुलक्षणे यांनी साधली आर्थिक समृद्धी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आणि शेळीपालनात अनन्य साधारण यश मिळवणारे हनुमान सुलक्षणे यांनी वयाच्या 18 व्या वर्षी दोन शेळ्या विकत घेऊन शेळी पालन व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हा त्यांचे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट व साधारण असल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करावी लागत होती.

अगदी मोलमजुरी करत असताना देखील त्यांनी शेळ्यांची देखभाल करणे सुरू ठेवले. कालांतराने त्यांनी शेळीपालन व्यवसायातील बारकावे शिकायला सुरुवात केली व यामध्ये शेळ्यांचे आरोग्य तसेच त्यांचे प्रजनन, चारा व्यवस्थापन शिकून घेतल्यावर शेळी पालन व्यवसाय वाढवण्याचे ठरवले व याकरिता शेड बांधले व सुविधा उभारण्यासाठी व्याजाने पैसा घेऊन भांडवल टाकले. सुरुवातीला हळूहळू पद्धतीने हा व्यवसाय वाढवत गेले व नंतर ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागल्यामुळे शेळी पालन व्यवसाय टप्प्याटप्प्याने वाढवत त्यातून चांगला नफा ते मिळवू लागले आहेत.

उच्च उत्पादनक्षम शेळ्यांच्या पालनावर आहे भर

हनुमान सुलक्षणे यांचे शेळीपालन व्यवसायाच्या यशामागील गमक जर पाहिले तर ते शेळीपालनामध्ये प्रजननक्षम आणि निरोगी शेळ्यांचा वापर करतात. मांस आणि दूध उत्पादनाकरिता उच्च दर्जाच्या शेळ्या आणि बोकड यांची निवड करण्यावर ते भर देतात व यामुळे दरवर्षी त्यांना आर्थिक उत्पन्न वाढवण्यामध्ये यश मिळाले आहे.

दर्जेदार शेळ्यांचे पालन करण्यावर भर दिल्यामुळे त्यांना कमी वेळेत मोठा नफा मिळवता येणे शक्य झाले आहे. त्यांचे जर शेळीपालन व्यवसायातील व्यवस्थापन बघितले तर याकरिता मांस उत्पादनासाठी तीन ते चार महिने वयाचा बोकड विकत घेतात व त्याचे जोपासना करून विक्री करतात.

या पद्धतीमध्ये खर्च तर कमी होतो आणि जोखीम देखील कमी होते. उच्च उत्पादनक्षम बोकड जर नसेल तर मात्र प्रजनन व्यवस्थापनामध्ये अडचणी येऊ शकतात. याकरिता ते योग्य व्यवस्थापनाच्या आधारे ही समस्या सोडवतात. वेळोवेळी उत्तम चारा व्यवस्थापन करून शेळ्यांची काळजी घेणे यावर त्यांनी काटेकोरपणे लक्ष ठेवले आहे. अशा पद्धतीने अभ्यासपूर्ण शेळीपालनातून ते वर्षाला पाच ते सहा लाख रुपयांचा नफा मिळवत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe