शेवगाव- शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या साईनाथ कवडे याला पोलिसांकडून व तपासी यंत्रणेकडून वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे त्यात फसलेल्या हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदारांना रक्कम व न्याय मिळण्याची शक्यता मावळली असून, तालुक्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास सीबीआय व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी बाळू बडे या गुंतवणूकदाराकडून करण्यात आली आहे.
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून तालुक्यातील रावताळे, कुरूडगाव येथील साईनाथ कल्याण कवडे याने अॅसिटेक सोल्यूशनच्या माध्यमातून हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली आहे. याबाबत त्याच्या विरोधात ३३० जणांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेले आहेत.

या फसवणुकीचा आवाका लक्षात घेता शेवगाव पोलिसांनी त्यास चार महिन्यापूर्वी अटक केलेली आहे. मात्र, याबाबत सुरू असलेल्या खटल्यामध्ये पोलीस व तपासी यंत्रणेकडून आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून होत आहे. त्यानुसार या यंत्रणेवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप गुंतवणूकदारांनी केले आहेत.
पाच हजार कोटींची व्याप्ती असलेल्या या फसवणुकीतून फक्त पाच कोटी रुपये डिसेंबरपर्यंत देण्याची बतावणी करून कवडे यास जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. गुंतवणूकदारांनी त्या विरोधात दिलेले असंख्य अर्ज कागदपत्र व पावत्या चार्जशीटमध्ये दाखविण्यात आलेल्या नाहीत. प्रत्यक्षात १० हजारांहून अधिक गुंतवणूकदार असताना केवळ ३३० जण दोषारोपपत्रासोबत दाखवले आहेत.
गुंतवणूकदारांना रक्कम परत देण्याऐवजी सोशल मिडीयाच्या माध्यमातून इडी व आयकर विभागाची भिती दाखवून धमकावण्यात आले आहे, त्यामुळे अनेक नोकरदार व बडे गुंतवणूकदार तक्रारीस घाबरत आहेत. आरोपीने गुंतवणूकदाराच्या पैशातून घेतलेली संपत्ती व मालमत्ता जप्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे केलेली असताना त्याबाबत कार्यवाही झालेली दिसत नाही. गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपीने इस्माईलपूर, ता. पैठण येथील जमीन संभाजीनगर येथील एका बड्या राजकीय लोकप्रतिनिधीच्या वाहनचालकांच्या पत्नीच्या नावे करण्यात आलेली आहे.
या व्यवहारात हस्तक्षेप करून प्रशासनाने ती जप्त करावी. याच नेत्याकडून हस्तक्षेप होत असल्याने तपासात जाणीवपूर्वक गती दिली जात नाही. एवढ्या मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांकडून ‘कॅश फ्लो’ तपासला नसून फॉरेन्सिक ऑडिटदेखील केलेले नाही व गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आलेला नाही. आरोपीने गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी केलेली मालमत्ता त्याचे कुटुंबातील आई-वडील व भाऊ हे परस्पर विल्हेवाट लावत आहेत, पुरावे नष्ट करत आहेत, त्यामुळे त्यांनाही तातडीने अटक करण्याची मागणी आहे.
मात्र, नऊ महिन्यांपासून गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना ते सापडत कसे नाहीत, हे मोठे गौडबंगाल आहे. त्यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित असताना त्यांना अटकेपासून वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. कवडेच्या अॅसिटेक सोल्युशन कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या गुन्ह्यात सहभाग असताना त्यांची चौकशीदेखील झालेली नाही व त्यांच्यावर कारवाईदेखील झालेली नाही. आरोपीने शेवगाव येथील सराफ व्यावसायिकांकडून २० किलोपेक्षा अधिक सोने खरेदी केलेले असताना त्या व्यावसायिकांची साक्ष नोंदण्यात आलेली नाही व आरोपीचे बँक लॉकर सील करण्यात आलेले नाहीत.
सध्या या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी कवडे यास नाशिक तुरूंग प्रशासनाकडून वैद्यकीय कारणांचा आधार घेऊन सुटका करण्यासाठी मदत केली जात आहे. तपासातील या सर्व अनियमिततेमुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा पोलीस व तपासी यंत्रणेवरील विश्वास उडाला असून, हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग व सीबीआय अशा सक्षम यंत्रणेकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी फसवणूक झालेल्या बाळू बाजीराव बडे यांसह अन्य गुंतवणूकदारांकडून करण्यात आली आहे.