Bajaj Auto Share Price:- आज शेअर बाजारात एक महत्वाची घटना घडली, जी अनेक गुंतवणूकदारांच्या नजरा वेधून घेणारी ठरली. बजाज ऑटो लिमिटेड या नामांकित वाहननिर्मिती कंपनीच्या शेअर्सचा आजचा व्यवहार एक्स-डिव्हिडंड झाला. म्हणजेच, ज्यांच्याकडे आज या कंपनीचे शेअर्स आहेत, त्यांना यंदाच्या लाभांशासाठी पात्र ठरवलं जाणार आहे आणि या वर्षीचा लाभांश काहीसा लक्षवेधी असून तो तब्बल प्रति शेअर २१० रुपये इतका आहे.
बजाज ऑटोचा महत्त्वाचा निर्णय काय?
बजाज ऑटोने यंदा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आधीच जाहीर केलं होतं की, पात्र गुंतवणूकदारांना २१० रुपयांचा लाभांश दिला जाणार आहे. त्यामुळे आज म्हणजेच २० जून हा दिवस रेकॉर्ड डेट ठरवण्यात आला आहे. जो गुंतवणूकदार आजपर्यंत शेअर धारक असेल, त्यालाच हा लाभांश मिळणार. कालच्या शेअर बाजारात बजाज ऑटोचा शेअर बीएसईवर ८४९६.२० रुपयांवर थांबला, थोडकाच म्हणजे ०.२० टक्क्यांची वाढ झाली होती. पण सर्वात मोठा फोकस या २१० रुपयांच्या लाभांशावरच होता.

याआधीही बजाज ऑटोने चांगले लाभांश दिले आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात कंपनीने प्रति शेअर ८० रुपये दिले होते. त्याआधी २०२२ आणि २०२३ या दोन्ही वर्षांत कंपनीने १४० रुपयांचा भरघोस लाभांश दिला होता. म्हणजेच, सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना परतावा देण्याची कंपनीची परंपरा कायम आहे. शिवाय, २०१० मध्ये कंपनीने एक शेअरवर एक बोनस शेअर देखील दिला होता. त्यानंतर मात्र अजून बोनस शेअर्स देण्यात आलेले नाहीत.
बजाज ऑटोच्या शेअरची सध्याची स्थिती
आता थोडं या शेअरच्या हालचालीकडे पाहूया. मागच्या तीन महिन्यांत या शेअरने १० टक्क्यांची वाढ दाखवली आहे. मात्र, वर्षभराचा विचार केला तर काही गुंतवणूकदारांना सुमारे १२ टक्क्यांचा तोटा सहन करावा लागला आहे. हे ऐकून जर तुमचं मन खट्टू झालं असेल, तर जरा दोन-तीन वर्षांचा कालावधी बघा.तिथे मात्र कंपनीने कमाल केली आहे. दोन वर्षांत तब्बल ८४ टक्के नफा, तीन वर्षांत १३३ टक्क्यांचा परतावा आणि पाच वर्षांत तर २१७ टक्के परतावा मिळाला आहे.