Bank Loan vs Online Loan:- आजच्या डिजिटल युगात वैयक्तिक कर्ज सहज उपलब्ध झाल्यामुळे अनेकांना तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे सोपे झाले आहे. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी दोन प्रमुख पर्याय आहेत ते म्हणजे बँकांमधून कर्ज घेणे किंवा ऑनलाइन अॅप्स आणि एनबीएफसीद्वारे डिजिटल पद्धतीने कर्ज मिळवणे. या दोन्ही पर्यायांमध्ये काही महत्त्वाचे फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे कोणता पर्याय निवडावा हे तुमच्या गरजांवर अवलंबून आहे.
बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचे फायदे आणि तोटे
![personal loan](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/zb.jpg)
बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी ग्राहकाला प्रत्यक्ष बँकेत जावे लागते आणि तेथे कर्जासाठी अर्ज करावा लागतो. यामध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकाला केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात आणि बँकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधावा लागतो. या प्रक्रियेमुळे कर्ज घेणाऱ्याला संपूर्ण अटी आणि शर्ती स्पष्ट होतात आणि कोणताही गोंधळ राहात नाही.
बँकेकडून कर्ज घेण्याचा एक मोठा फायदा म्हणजे जर तुमच्याकडे चांगली क्रेडिट स्कोर आणि स्थिर उत्पन्न असेल तर तुम्हाला तुलनेने कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. बँका साधारणतः 10% ते 18% वार्षिक व्याजदराने कर्ज देतात.
जे ऑनलाइन कर्जाच्या तुलनेत थोडे स्वस्त असते. तसेच बँका मोठ्या रकमेचे कर्ज सहज उपलब्ध करून देतात. मात्र बँकांकडून कर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यास काही दिवस लागू शकतात, त्यामुळे त्वरित आर्थिक गरज असलेल्या लोकांसाठी हा पर्याय कमी अनुकूल ठरतो.
ऑनलाइन अॅप्स आणि एनबीएफसीद्वारे पर्सनल लोन घेण्याचे फायदे आणि तोटे
ऑनलाइन कर्ज मिळवणे हे अत्यंत सोपे आणि वेगवान झाले आहे. अनेक बँका, नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपन्या (NBFCs) आणि फायनान्स टेक कंपन्या मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून काही मिनिटांत कर्ज वितरीत करतात. ग्राहकांना फक्त ऑनलाइन अर्ज भरावा लागतो.डिजिटल दस्तऐवज अपलोड करावे लागतात आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
ऑनलाइन कर्जाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फिजिकल कागदपत्रांची गरज नसते आणि बँकेत जाण्याची आवश्यकता राहत नाही. काही मिनिटांत किंवा तासांतच कर्ज मिळू शकते. त्यामुळे तातडीच्या गरजांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो.
मात्र या कर्जाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यावरील व्याजदर तुलनेने अधिक असतो. बहुतेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म 12% ते 24% वार्षिक व्याजदराने कर्ज देतात. जे पारंपरिक बँक कर्जाच्या तुलनेत जास्त आहे. याशिवाय काही अॅप्स आणि एनबीएफसी कंपन्या अतिरिक्त शुल्क आकारतात, ज्यामुळे एकूण परतफेडीचा खर्च वाढतो.
कोणता पर्याय सर्वोत्तम आहे?
तुमच्या आर्थिक गरजांनुसार योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.जर तुम्हाला कमी व्याजदरावर मोठ्या रकमेचे कर्ज हवे असेल आणि वेळेची अडचण नसेल तर बँकेकडून कर्ज घेणे चांगले ठरेल.जर तुम्हाला तातडीने लहान रकमेचे कर्ज हवे असेल आणि तुम्ही काहीसे अधिक व्याज देण्यास तयार असाल तर ऑनलाइन कर्ज हा उत्तम पर्याय असू शकतो
बँक आणि ऑनलाइन कर्ज यातील फरक समजून घेतल्यास तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकता. कोणत्याही परिस्थितीत कर्ज घेण्यापूर्वी त्याचे अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात आणि फसवणुकीपासून सावध राहावे.