एटीएमचा वापर करा आणि तुमचा नवीन मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करा! जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Banking Information:-बँक ट्रांजेक्शन किंवा व्यवहारांच्या बाबतीत बघितले तर यामध्ये तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे खूप गरजेचे आहे. आपल्याला माहित आहे की,जर मोबाईल क्रमांक हा बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला तुम्ही करत असलेल्या व्यवहारांच्या अर्थात ट्रांजेक्शनच्या बाबतीतले संदेश म्हणजेच एसएमएस हे तुमच्या मोबाईलवर येतात व तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी संबंधित संपूर्ण माहिती मिळत राहते व तुम्ही त्याबाबतीत अपडेट राहतात.

तसेच बँकांच्या माध्यमातून ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचना देखील या मोबाईल नंबरच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात. परंतु बऱ्याचदा आपण अगोदर एखादा नंबर बँकेला दिलेला असतो आणि कालांतराने काही कारणास्तव आपण मोबाईल नंबर बदलतो.

अशावेळी मात्र खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होऊ शकते. अशाप्रसंगी समजा तुम्ही नंबर बदलला असेल तर नवीन नंबर बँक खात्याशी रजिस्टर किंवा लिंक करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते.

परंतु आता तुम्हाला अशाप्रकारे नवीन मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी तुम्ही एटीएमचा वापर करून सहजपणे मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक करू शकतात. त्याचीच स्टेप बाय स्टेप माहिती आपण बघू.

एटीएमचा वापर करा व बँक खात्याशी नवीन मोबाईल नंबर लिंक किंवा अपडेट करा

1- याकरिता तुम्हाला तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्याच बँकेच्या एटीएमला भेट द्यावी लागेल.कारण बऱ्याच बँका त्यांच्या एटीएमद्वारेच मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा देतात. त्यामुळे तुमचे ज्या बँकेत खाते आहेत त्याच बँकेचे एटीएम वापरणे महत्त्वाचे आहे.

2- एटीएममध्ये गेल्यानंतर एटीएम मशीनमध्ये डेबिट कार्ड इन्सर्ट करावे आणि तुमचा जो काही पिन असेल तो नमूद करावा. त्यानंतर स्क्रीनवर अतिरिक्त पर्याय यावर क्लिक करावे.

3- या अतिरिक्त पर्याय अंतर्गत मोबाईल नंबर अपडेट हा पर्याय निवडावा.

4- त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो नवीन दहा अंकी मोबाईल नंबर टाईप करावा आणि नंतर सबमिट करावे.

5- नंतर तुमच्या नवीन मोबाईल नंबरची पुष्टी करावी व त्यासाठी तुमचा नवीन मोबाईल नंबर पुन्हा एंटर करावा. अशा प्रकारे दोनदा तपासणी झाल्यामुळे तुमचा मोबाईल नंबर अचूक आहे याची खात्री तुम्हाला मिळते.

6- त्यानंतर ही शेवटची पायरी असून ती पूर्ण केल्यानंतर तुमचा नवीन मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडला जातो. इतकेच नाहीतर तुमचा नवीन मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक झाला याबद्दलची खात्री देणारा संदेश देखील प्राप्त होतो.