Banking News : बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्हाला या जानेवारी महिन्यात बँकेशी निगडित कामे करायची असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरे तर बँक कर्मचारी या महिन्यात संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान या संपामुळे जानेवारी महिन्यात बँका सलग तीन दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे बँकिंग कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान , आज आपण बँक कर्मचारी कधी देशव्यापी संप पुकारणार आहेत, या निर्णयाचा नेमका काय परिणाम होणार तसेच संप पुकारण्याचे प्रमुख कारण काय याचा आढावा या लेखातून घेणार आहोत.
बँक कर्मचारी कधी संप पुकारणार?

मिळालेल्या माहितीनुसार बँक कर्मचारी प्रजासत्ताक दिनाच्या आसपासच संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बँक कर्मचारी 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी संप पुकारणार आहेत. या संपाची युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने घोषणा केली आहे. खरे तर 25 जानेवारी रोजी रविवार निमित्ताने देशभरातील बँका बंद राहणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिन असल्याने 26 जानेवारी 2026 रोजी देशभरातील बँका बंद राहतील आणि 27 जानेवारीला बँक कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे यामुळे या दिवशी पण सुट्टी नसतानाही बँका बंद ठेवल्या जातील अशा स्थितीत देशभरातील बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत . यामुळे बँकेच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बँक ग्राहकांना या संपाच्या पार्श्वभूमीवर मनस्ताप सहन करावा लागू शकतो. आता आपण हा संप पुकारण्याचे नेमके कारण काय याचीच माहिती घेणार आहोत.
संप पुकारण्याचे नेमके कारण काय?
संपामुळे देशभरातील सार्वजनिक, खासगी, ग्रामीण तसेच सहकारी बँकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता असून, सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जानेवारी महिन्यात 25, 26 आणि 27 तारखेला बँका बंद राहणार आहेत. याचा थेट परिणाम चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार, कर्ज वितरण, सरकारी योजनांचे पैसे, पेन्शन आणि इतर महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांवर होणार आहे. 27 जानेवारी रोजीचा संप हा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणी पूर्ण होत नसल्याने पुकारण्यात येणार आहे. मंडळी सध्या बँक कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच सुटी दिली जाते. मात्र, इतर सर्व शासकीय कार्यालयांप्रमाणे चारही शनिवारी सुटी देऊन ‘पाच दिवसांचा आठवडा’ लागू करावा, ही मागणी कर्मचारी संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.
वाढलेला कामाचा ताण, तांत्रिक बदल, डिजिटल बँकिंगची जबाबदारी आणि कर्मचारी कमतरता यामुळे कामाच्या वेळेत सुधारणा करणे गरजेचे असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे मार्च 2024 मध्ये झालेल्या वेतन करारामध्ये IBA अर्थात इंडियन बँक्स असोसिएशन आणि UFBU म्हणजेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन यांच्यात पाच दिवसांच्या आठवड्याबाबत तत्त्वतः सहमती झाली होती. मात्र, हा निर्णय प्रत्यक्षात लागू करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असून, अद्याप सरकारकडून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
UFBU ने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवली जाईल. त्यामुळे ग्राहकांनी संपापूर्वी महत्त्वाचे बँक व्यवहार पूर्ण करून ठेवावेत, असे आवाहनही करण्यात येत आहे.












