Income Tax Rule : भारतात अलीकडे रोकड व्यवहारांची संख्या कमी झाली आहे. अनेकजण आता ऑनलाईन पेमेंट करत आहेत. यासाठी बाजारात वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन उपलब्ध आहेत.
फोन पे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे अशा विविध पेमेंट एप्लीकेशनचा भारतात मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. विशेष म्हणजे अनेक कंपन्यांच्या माध्यमातून आता डिजिटल पेमेंट एप्लीकेशन तयार केले जात आहेत. टाटा ही देशातील एक नामांकित कंपनी देखील टाटा पे नावाचे एक नवीन डिजिटल पेमेंट एप्लीकेशन बाजारात आणणार आहे.

एकंदरीत देशात आता ऑनलाइन व्यवहाराला सुलभता आली आहे. पण देशात एकीकडे ऑनलाइन पेमेंट मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत तर दुसरीकडे देशात असे अनेक लोक आहेत जे आजही ऑनलाइन पेमेंट ऐवजी कॅशने व्यवहार करण्याला प्राधान्य देत आहेत.
अनेकांना कॅशने व्यवहार करणे सोपे वाटते. हेच कारण आहे की रोकड व्यवहार आजही मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर काही लोक आयकर विभागापासून वाचण्यासाठी देखील कॅशने ट्रांजेक्शन करतात.
मात्र असे असले तरी आयकर विभाग कॅशने ट्रांजेक्शन करणाऱ्या लोकांकडे बारीक लक्ष ठेवून असते. दरम्यान आज आपण कोणते व्यवहार कॅशने केले तर आयकर विभाग नोटीस पाठवू शकते याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँकेत ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पैसे जमा केले तर : जर तुम्ही एका वर्षात दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम एका बँक खात्यात किंवा मल्टिपल बँक खात्यात जमा केली असेल तर आयकर विभागाच्या माध्यमातून तुम्हाला नोटीस येणे अपेक्षित आहे. अशावेळी इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून तुम्हाला सदर पैशांचा स्रोत विचारला जाऊ शकतो. म्हणजेच हे पैसे तुमच्याकडून कुठून आलेत, तुम्ही हे पैसे कसे कमावले याबाबत आयकर विभाग तुम्हाला प्रश्न विचारू शकते.
फिक्स डिपॉझिट करताना : जर तुम्ही एका किंवा एकापेक्षा अधिक फिक्स डिपॉझिट मध्ये एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा केली तर आयकर विभाग तुम्हाला प्रश्न विचारू शकते. इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून अशा प्रकरणांमध्ये नोटीस देखील बजावली जाते.
मालमत्ता खरेदी करताना : जर तुम्ही मालमत्ता खरेदी करताना तीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम कॅशने दिली असेल तर अशावेळी देखील आयकर विभागाच्या माध्यमातून तुम्हाला नोटीस पाठवली जाते. अशा प्रकरणांमध्ये आयकर विभागाच्या माध्यमातून पैशांचे स्रोत विचारले जातात.
क्रेडिट कार्ड बिल भरताना : जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि तुमचे क्रेडिट कार्डचे बिल एक लाख रुपयांपेक्षा अधिकचे झाले असेल आणि तुम्ही हे बिल कॅशने दिले असेल तरी देखील आयकर विभागाच्या माध्यमातून तुम्हाला नोटीस बजावली जाऊ शकते. एवढेच नाही जर तुम्ही एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे पेमेंट कोणत्याही माध्यमातून केलेले असेल तरी देखील तुम्हाला आयकरची नोटीस येऊ शकते.