Smallcap Stock Rally:- आज शेअर बाजारात एक छोटा पण लक्ष वेधून घेणारा स्टॉक चांगलाच झळकला. स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसांत चक्क ५० टक्क्यांहून अधिक उडी घेतली आहे. ७५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर थेट ११४ रुपयांच्या घरात पोहोचला आणि गुंतवणूकदारांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या.
मंगळवारी म्हणजे १७ जून रोजी स्टरलाइट टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. दिवसभरात व्यवहारांचं प्रमाण तब्बल नऊ पटीनं वाढलेलं दिसून आलं. बाजारात अशा प्रकारची गती एखाद्या ठोस कारणामुळेच येते आणि याहीवेळी तसंच झालंय.

या वाढीमागील प्रमुख कारण काय?
कंपनीनं अलीकडेच आपल्या डेटा सेंटर व्यवसायात नवे सोल्यूशन्स सादर केल्याचं जाहीर केलं. वाढत्या एआय आणि डिजिटल सेवा क्षेत्राच्या गरजा लक्षात घेता, स्टरलाइट टेक्नॉलॉजीजनं ऑप्टिकल आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीवर भर देणारे उपाय सादर केले आहेत. विशेष म्हणजे हे सोल्यूशन्स हायपरस्केल डेटा सेंटरपासून टेलिकॉम कंपन्यांपर्यंत सर्वांनाच उपयोगी ठरणार आहेत. यामध्ये उच्च कार्यक्षमतेच्या फायबर आणि कॉपर केबलिंगचा समावेश असून, ‘एंड-टू-एंड’ कनेक्टिव्हिटीचा अनुभव देण्यावर कंपनीचा जोर आहे.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीनं टेक डेटा-इंडिया या टीडी सिनेक्सच्या उपकंपनीसोबत भागीदारी केली आहे. ही भागीदारी भारतातल्या आयटी क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरू शकते. अशा सकारात्मक घडामोडींमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह वाढलेला दिसतो.
या कंपनीच्या शेअरची सध्याची स्थिती काय?
कंपनीच्या शेअरचा आताचा भाव ५२ आठवड्यांच्या उच्चांकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. ज्या पद्धतीनं स्टरलाइट टेक्नॉलॉजीजच्या स्टॉकनं सध्या उसळी घेतली आहे, ती पाहता येत्या काळात आणखी तेजी पाहायला मिळू शकते. मात्र गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घेणं नेहमीच आवश्यक असतं, कारण स्मॉलकॅप शेअर्समधील चढ-उतार झपाट्यानं होऊ शकतात.
एकंदरीत पाहता स्टरलाइट टेक्नॉलॉजीजचा शेअर सध्या तेजीत आहे आणि कंपनीच्या धोरणात्मक पावलं त्यामागे मुख्य कारण ठरत आहेत. डेटा सेंटर क्षेत्रातल्या वाढत्या संधींचा लाभ कंपनी कसा घेत जाते, यावर आगामी काळात गुंतवणूकदारांचं लक्ष राहणार आहे.