Ahilyanagar News: अहिल्यानगर – शेअर बाजारात तेजी असताना सोन्याच्या किमतींनीही उच्चांक गाठला आहे. गेल्या एका महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची वाढ झाली आहे, असे आंतरराष्ट्रीय सोने बाजाराच्या तज्ज्ञांनी सांगितले. सोमवारी अहिल्यानगरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६ हजार रुपये प्रतितोळा, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ८९,२०० रुपये होता. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, अक्षय्य तृतीया सणापूर्वी सोन्याचे दर १ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.
नवा उच्चांक
गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता आणि अमेरिका-चीनमधील व्यापारी तणावामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून आले. मात्र, या आठवड्यात सोन्याने नवीन उच्चांक गाठला, तर चांदीच्या दरातही वाढ झाली. सोमवारी अहिल्यानगरमध्ये चांदीचा भाव ९६ हजार रुपये प्रतिकिलो नोंदवला गेला.

खरेदीसाठी गर्दी
लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दागिन्यांना प्रचंड मागणी आहे. सोन्याच्या किमती उच्चांकी असूनही, महिलांमध्ये सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याचा उत्साह दिसत आहे. गुंतवणुकीसाठीही अनेकांनी सोन्याची खरेदी केली.
सोमवारी सकाळपासून सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली होती. अहिल्यानगरात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, परंतु सध्याच्या बाजारातील अस्थिरतेमुळे अनेकांचा कल सोन्याकडे वळला आहे. गुंतवणूकदार सोन्याच्या दरांवर सतत लक्ष ठेवून आहेत.
महिलांनी सोन्याच्या हार, बांगड्या, अंगठ्या आणि विविध डिझाइनच्या दागिन्यांना पसंती दिली, तर चांदीच्या पायघड्या आणि जोडव्यांना विशेष मागणी होती. काही ग्राहकांनी गुंतवणुकीच्या उद्देशाने सोने आणि चांदी खरेदी केली.
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
सोन्याच्या किमतींनी उच्चांक गाठल्याने गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि चलनवाढीच्या काळात सोने हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. अक्षय्य तृतीयेसारख्या सणांमुळे सोन्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किमतीत आणखी वाढ होऊ शकते. “सोन्याची मागणी आणि किंमती येत्या काळात वाढतच राहतील,” असे आंतरराष्ट्रीय सोने बाजाराचे अभ्यासक अमित पोखरणा यांनी सांगितले.