Business Success Story:- कतारसारख्या देशात चांगली नोकरी मिळाली की अनेक जण तिथेच आयुष्य घालवायचे ठरवतात. पण काही जण असेही असतात की ज्यांना स्वतःचं काहीतरी वेगळं करण्याची ओढ असते. अशीच एक प्रेरणादायी आणि यशस्वी कथा आहे केरळमधील नहज बशीर यांची.
नहज यांना कतारमध्ये उत्तम नोकरी मिळालेली होती, पण त्यांचे मन मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सतत धडपडत होते. त्यांच्या घरच्यांनी सुरुवातीला त्यांना विरोध केला, पण त्यांच्या आईने पाठिंबा दिला आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नहज यांनी पुढाकार घेतला. त्यांचे हे पाऊल काहीसं धाडसी आणि जोखमीचं होतं, पण त्यांचा आत्मविश्वास आणि मेहनतीवर विश्वास होता.

नहज यांना कशी सुचली व्यवसायाची कल्पना?
कतारमध्ये राहून नहज यांना तिथे मिळणारं दही खूप आवडायचं. भारतात, विशेषतः केरळमध्ये, दह्याची चव थोडी आंबट असल्याने त्यांना ती फारशी रुचायची नाही. यावरूनच त्यांना कल्पना सुचली की आपण भारतातही अशीच चव असलेलं, दर्जेदार आणि विविध फ्लेवर्समध्ये दही तयार करू शकतो.
त्यांनी 2020 साली “क्रॅम्बरी” या नावाने कंपनीची स्थापना केली आणि दर्जेदार दही उत्पादनाला सुरुवात केली. हे दही विविध फळांच्या चवीनं समृद्ध होतं, तर मसालेदार “सांभारम” सारखं दहीही त्यांनी तयार केलं जे दाक्षिणात्य चवप्रेमींना विशेष आवडू लागलं.
अशाप्रकारे केली व्यवसायात वाढ
या व्यवसायाची सुरुवात काही सोपी नव्हती. सुरुवातीला नहज स्वतः मॉलमध्ये जाऊन ग्राहकांना दह्याचे मोफत नमुने देत असत. सोशल मीडियाचा वापर करण्याऐवजी त्यांनी थेट ग्राहकांशी संवाद साधण्याचा मार्ग निवडला. लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया त्यांनी मनापासून ऐकल्या आणि त्यात सुधारणा केल्या.
सुरुवातीला काही लोकांनी चेष्टा केली, काहींनी त्यांचा उपहासही केला. पण नहज यांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं होतं की लोकांना दर्जेदार आणि वेगळी चव देणारे दही पुरवायचंच.
हळूहळू त्यांच्या मेहनतीचं चीज होऊ लागलं. केरळमधील प्रसिद्ध लुलू मॉलपासून सुरुवात झालेली क्रॅम्बरीची उत्पादने आता कर्नाटक, तामिळनाडू आणि इतर अनेक राज्यांतील सुपरमार्केट्समध्ये सहज उपलब्ध झाली आहेत. इतकंच नाही तर पंचतारांकित हॉटेल्स आणि काही विमान कंपन्यांमध्येही त्यांची उत्पादने दिली जातात.
अंबानी कुटुंब आहे नहज यांचे ग्राहक
या व्यवसायातील एक मोठा टप्पा तेव्हा गाठला गेला, जेव्हा देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजे अंबानी कुटुंबाने त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी १०,००० दह्याच्या पॅकेट्सची ऑर्डर दिली. या समारंभात बिल गेट्स, मार्क झुकरबर्गसारखे जगप्रसिद्ध व्यक्तीमत्वं उपस्थित होते आणि त्यांनीही क्रॅम्बरीचे दही चाखले होते. यामुळे नहज यांना देश-विदेशात एक वेगळी ओळख मिळाली.
वर्षाला आहे 15 कोटींची उलाढाल
आज नहज बशीर यांची क्रॅम्बरी कंपनी वर्षाला तब्बल १५ कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, मेहनत आणि गुणवत्ता यामुळे त्यांचे उत्पादन ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.
ही केवळ दह्याची यशोगाथा नाही, तर एक युवकाच्या धाडस, कल्पकतेचा आणि जिद्दीचा आदर्श उदाहरण आहे. परदेशातील चमकदार करिअर सोडून भारतात व्यवसाय करून मोठं यश मिळवणारा नहज बशीर आज अनेक तरुणांसाठी प्रेरणा ठरतो आहे.