Cibil Score For Home Loan:– गृहकर्ज घेण्यासाठी CIBIL स्कोअर किती असावा हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हा स्कोअर बँका आणि वित्तीय संस्थांसाठी तुमच्या क्रेडिटविषयक विश्वासार्हतेचा महत्वपूर्ण मानांक किंवा एक सिम्बॉल असतो. हा स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असतो आणि तुमच्या मागील कर्जफेडीच्या सवयींवर आधारित असतो. जर तुमचा CIBIL स्कोअर जास्त असेल तर बँका आणि वित्तीय संस्था तुम्हाला चांगल्या अटींवर आणि कमी व्याजदरावर कर्ज देण्यास तयार असतात. याउलट जर स्कोअर कमी असेल तर कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते किंवा अधिक व्याजदर भरावा लागू शकतो.
होमलोन साठी सिबिल स्कोर महत्त्वाचा का?
गृहकर्ज घेण्यासाठी बहुतांश बँका आणि वित्तीय संस्थांकडून किमान 650 किंवा त्यापेक्षा अधिक CIBIL स्कोअरची मागणी केली जाते. हा स्कोअर दिलासादायक किंवा महत्त्वाचा मानला जातो आणि बँका कर्ज देण्यास सहसा सहमत असतात. तथापि, जर तुमचा स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला अधिक चांगल्या व्याजदरावर,मोठ्या कर्जरकमेवर आणि लवचिक परतफेडीच्या अटींसह कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते. बँका अशा ग्राहकांना कमी जोखमीचे मानतात आणि त्यांना प्राधान्याने कर्ज मंजूर करतात.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahmednagar-News-2025-02-07T162905.155.jpg)
सिबिल स्कोर कमी असण्याचे तोटे
CIBIL स्कोअर जर कमी असेल तर त्याचे काही तोटे असतात. कमी स्कोअरमुळे बँका आणि वित्तीय संस्था कर्ज मंजूर करण्यास बहुदा टाळाटाळा करतात किंवा तुमच्याकडून जास्त व्याजदर आकारू शकतात. काही प्रकरणांमध्ये बँक अधिक कडक अटी लावू शकते. जसे की,जामीनदाराची मागणी करणे किंवा कमी कर्ज रक्कम मंजूर करणे. काही अर्जदारांना तर थेट कर्ज नकार मिळतो.ज्यामुळे त्यांना घर खरेदीसाठी इतर पर्याय शोधावे लागतात. त्यामुळे गृहकर्ज घेण्यापूर्वी आपला CIBIL स्कोअर तपासणे आणि आवश्यक असल्यास तो सुधारण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.
CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी
CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सर्वप्रथम कर्जाचे हप्ते किंवा क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणे हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. कारण विलंब केल्यास तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर नकारात्मक परिणाम होतो. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डचा वापर संयमाने करणे देखील आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या क्रेडिट लिमिटचा ३०% किंवा त्यापेक्षा कमी भाग वापरल्यास तुमचा स्कोअर सुधारण्यास मदत होते. वारंवार कर्जासाठी अर्ज करणे टाळावे. कारण प्रत्येक वेळी बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा क्रेडिट स्कोअर तपासते आणि वारंवार तपासणी झाल्यास स्कोअर कमी होतो. त्याचबरोबर आपला क्रेडिट इतिहास वेळोवेळी तपासत राहणे आणि चुकीची माहिती असल्यास त्वरित दुरुस्त करणेही महत्त्वाचे असते.
जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमचा CIBIL स्कोअर वेळेवर तपासा आणि आवश्यक असल्यास सुधारण्याच्या पद्धती अमलात आणा. उच्च CIBIL स्कोअर फक्त कर्ज मंजुरीस मदत करत नाही तर तुम्हाला कमी व्याजदर आणि उत्तम कर्ज अटींसाठीही पात्र ठरवतो. त्यामुळे आर्थिक शिस्त पाळून तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणे ही गृहकर्ज घेण्यासाठी एक महत्त्वाची पूर्वतयारी ठरू शकते.