जातेगाव- सुपा येथील ‘सिस्पे कंपनी’ ने गाशा गुंडाळल्याने सुपा परिसरातील गुंतवणूकदारांचे सुमारे चारशे कोटी रुपये बुडाल्यात जमा आहे. मोठा परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या सुपा परिसरातील हजारो गुंतवणूकदारांचे सुमारे चारशे कोटी रुपये अडकले आहेत. ‘सिस्पे कंपनी’ ने गाशा गुंडाळला असून, सुमारे चार महिन्यांपासून फक्त लवकरच तुमचे पैसे मिळतील काळजी करू नका, अशा भूलथापा दिल्या जात असून, याविरोधात ठेवीदार आक्रमक झाले असून, शुक्रवार दि.१८ जुलै रोजी संबंधित एजंटला जाब विचारणार आहे. त्यानंतर सुपा पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ठेवीदारांनी दिली.
बुधवारी सर्व ठेवीदार एकत्र येऊन सुपा येथील इन्फोटेक बिकन, या शाखेत गेले असता, ही शाखाच १५ दिवसांपासून बंद असल्याचे ठेवीदारांना समजले. दरम्यान, आम्ही आहोत अशी आश्वासने देण्याचे काम येथील कंपनीच्या एजंटांनी केले आहे. गुंतवणूकदार पैसे मागण्यासाठी चकरा मारत आहेत. मात्र, आता पंधरा दिवसांपासून कार्यालयच बंद झाल्याने अनेक जण याबाबत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

सुपा व परिसरातील गुंतवणुकदारांचे प्रथम सिस्पे नंतर ‘झेस्ट’ या नावाची शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली व १० ते १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रूपये जमा केले. या कंपनीकडूनही गुंतवणुकदारांचे काही दिवसांपासून पैसे परत मिळेनासे झाले आहेत. कंपनीचे काम सुरू आहे. कंपनीचे नाव बदलले आहे. परकीय चलनात आपले शेअर्स बदलले जात आहेत, सॉफ्टवेअर दुरूस्ती सुरू आहे, अशी कारणे सांगत गुंतवणुकदारांना काही दिवस झुलवत ठेवले होते. आता मात्र कंपनीचे कार्यालय गेल्या पंधरा दिवसांपासून बंद झाल्याने आता पैसे मिळणार नाहीत, अशी खात्री गुंतवणुकदारांची झाली आहे. त्यामुळे काही गुंतवणुकदार एकत्र येऊन तक्रार देण्याच्या तयारीत आहेत.
अनेकांनी कर्ज काढून तर काहींनी आपली सेवानिवृत्तीची पुंजी यात गुंतविल्याची चर्चा सुरू आहे. सुपा परिसरात नव्याने एमआयडीसी झाल्याने त्या ठिकाणी ज्यांच्या जमिनी गेल्या होत्या, त्यांना जमिनीचे पैसे मिळाले होते. त्यांनी ते पैसे यात गुंतविले आहेत. त्यामुळे आता जमीनही गेली व पैसेही गेले, अशी काहींची अवस्था झाली आहे.
याच कंपनीच्या नावाने पारनेरसह श्रीगोंदे, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली असून, ती सुमारे तीन हजार तीनशे कोटी रूपये असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याविरोधात ठेवीदार आक्रमक झाले असून, याचा उद्रेक बुधवारी शाखेसमोर पाहावयास मिळाला.