Pm Kisan Mandhan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक इत्यादींसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत.
या योजनांच्या माध्यमातून शासनाकडून समाज हित जोपासण्याचा प्रयत्न होतो. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने आत्तापर्यंत शेकडे योजना सुरू केल्या आहेत. यातील काही योजना संपूर्ण देशात लोकप्रिय आहेत. अशीच एक योजना आहे पी एम किसान मानधन योजना. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकऱ्यांना त्यांची वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये दिले जातात.
म्हणजे पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्याला दरवर्षी 36 हजार रुपयाचा लाभ मिळतो. खरे तर, शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही एक पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत महिला तसेच पुरुष शेतकऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहे योजनेचे स्वरूप ?
पी एम किसान मानधन योजना केंद्र सरकारने सुरू केलेली एक पेन्शन योजना आहे. या योजनेत फक्त शेतकरी सहभागी होऊ शकतात. या योजनेत सहभाग घेतल्यानंतर शेतकऱ्यांना सुरुवातीला पैसे गुंतवावे लागतात. दरमहा 55 ते 200 रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक रक्कम वयानुसार बदलते.
जेवढे कमी वय तेवढी गुंतवणुकीची रक्कम कमी असे या योजनेचे समीकरण आहे. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटाचे पुरुष आणि महिला शेतकरी सहभागी होऊ शकतात. 2019 च्या नोंदीप्रमाणे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी लागवड योग्य म्हणजेच शेतीयोग्य जमीन असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर योजनेत सहभाग घेतल्यानंतर वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत 55 ते 200 रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवावी लागते.
किती पैसे भरावे लागणार ?
जर पीएम किसान मानधन योजनेत शेतकऱ्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी नोंदणी केली तर त्यांना प्रत्येक महिन्याला 55 रुपये भरावे लागणार आहेत. दुसरीकडे जे शेतकरी त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरू करतील त्यांना प्रत्येक महिन्याला दोनशे रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
गुंतवणूक सुरू केल्यानंतर वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत ही गुंतवणूक सुरू ठेवावी लागणार आहे. मग वयाची साठ वर्षे पूर्ण झालेत की या योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहेत.
ही एक ऐच्छिक योजना आहे. या योजनेला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी याचा लाभ घेतला आहे. बिहार आणि झारखंड सारख्या राज्यांमधील शेतकऱ्यांनी या योजनेत सर्वाधिक सहभाग घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.