HDFC Mutual Fund:- एचडीएफसी म्युच्युअल फंडाने एप्रिल २०२३ मध्ये एकाच दिवशी दोन नवे फंड लाँच केले होते.एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड आणि एचडीएफसी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड. या दोन्ही योजनांनी गुंतवणूकदारांसाठी अल्पावधीतच दमदार परतावा दिला आहे.
एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंडाने लाँच झाल्यापासून ४७.३२% वार्षिक परतावा दिला आहे. तर एचडीएफसी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंडने ४१.३५% परतावा नोंदवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोन्ही योजना गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरत आहेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-22.jpg)
एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड
हा फंड निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स (टीआरआय) ट्रॅक करतो आणि लार्ज व मिडकॅप कंपन्यांव्यतिरिक्त स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देतो. देशातील २५१ व्या ते ५०० व्या क्रमांकाच्या कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करतो. स्मॉलकॅप कंपन्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात.
त्यामुळे मोठ्या परताव्याची शक्यता अधिक असते.फक्त ०.३% खर्चाचे प्रमाण असल्याने हा फंड कमी खर्चात चांगला परतावा मिळवण्याचा पर्याय देतो. गेल्या एका वर्षात २५.९३% सरासरी परतावा तर लाँचपासून ४७.३२% परतावा याने दिला आहे.
हा फंड कोणासाठी योग्य आहे?
ज्यांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची आहे आणि लार्ज/मिडकॅप व्यतिरिक्त स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करायची आहे.ज्यांचा गुंतवणुकीचा कालावधी ३ वर्षे किंवा त्याहून अधिक आहे.ज्यांना उच्च जोखीम पत्करून अधिक परतावा मिळवायचा आहे. अशांसाठी हा फंड फायद्याचा आहे.
एचडीएफसी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड
हा फंड निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स (टीआरआय) ट्रॅक करतो आणि मिडकॅप कंपन्यांमधील संधी उपलब्ध करून देतो. हा फंड देशातील १०१ व्या ते २५० व्या क्रमांकाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. मिडकॅप कंपन्यांमध्ये लार्ज-कॅपमध्ये वाढण्याची क्षमता असल्याने दीर्घकालीन चांगले परतावे मिळण्याची शक्यता असते.
या फंडाने गेल्या एका वर्षात २३.६०% सरासरी परतावा तर लाँचपासून ४१.३५% परतावा दिला आहे. खर्चाचे प्रमाण कमी (०.३%) असल्यामुळे कमी खर्चात चांगल्या परताव्याचा पर्याय उपलब्ध होतो.
हा फंड कोणासाठी योग्य आहे?
ज्यांना मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून लार्ज-कॅपच्या पुढील संधीचा लाभ घ्यायचा आहे.तसेच ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करायची आहे.ज्यांना थोडी कमी जोखीम पत्करून अधिक स्थिर परताव्याचा पर्याय हवा आहे.अशांसाठी हा फंड फायद्याचा आहे.
स्मॉलकॅप की मिडकॅप कोणता फंड निवडावा ?
जर जास्त जोखीम घेऊन अधिक परतावा मिळवण्याची तयारी असेल तर एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड हा पर्याय चांगला ठरू शकतो. स्मॉलकॅप फंड अधिक अस्थिर असतो. परंतु दीर्घकालीन मोठे परतावे देऊ शकतो.
तर थोडी स्थिरता आणि दीर्घकालीन चांगले परतावे हवे असतील तर एचडीएफसी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड हा अधिक समतोल पर्याय आहे.मिडकॅप कंपन्यांमध्ये मोठी वाढ होण्याची क्षमता असते.परंतु त्यातील अस्थिरता लार्ज-कॅपपेक्षा अधिक असते.
गुंतवणुकीपूर्वी काय लक्षात ठेवावे ?
कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.या दोन्ही फंडांमध्ये थेट स्टॉक्सची निवड करण्याची गरज नसते. कारण ते अनुक्रमे स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्सना ट्रॅक करतात.
जर तुम्हाला लार्ज-कॅपपेक्षा जास्त परतावा मिळवायचा असेल आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तर या फंडांचा पर्याय विचारात घेता येईल. मात्र बाजारातील अस्थिरतेमुळे दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोन आवश्यक आहे.
गुंतवणूकदारांनी योग्य फंडाची निवड करावी
एचडीएफसीच्या या दोन योजनांनी अल्पावधीतच चांगली कामगिरी केली आहे. मात्र फक्त मागील परताव्यांच्या आधारावर गुंतवणुकीचा निर्णय घेणे योग्य नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराने त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य फंड निवडला पाहिजे.