Edible Oil Rate : येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. सणासुदीचा हंगाम सुरू झाला की दरवर्षी खाद्य तेलाच्या किमती वाढत असतात. यंदाही नवरात्र उत्सवात खाद्यतेलाच्या किमती वाढणार आहेत.
खरेतर, गेल्या वर्षी केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात तब्बल २० टक्क्यांनी वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.

या निर्णयाचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. सदर निर्णयाने खाद्यतेलाच्या दरांमध्ये झपाट्याने वाढ झाली. गेल्यावर्षी ऐन सणासुदीच्या काळात हा निर्णय घेण्यात आला म्हणून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला होता.
मागील सहा महिन्यांत शेंगदाणा, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरात ५० रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, घरगुती खर्चातही ताण निर्माण झाला आहे.
यंदाही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते पुढील पंधरा दिवसांत दर किलोमागे ५ ते १० रुपये वाढ होऊ शकते.
पावसामुळे उत्पादन घटल्याने या वर्षी सूर्यफूल व शेंगदाणा तेलाचे दर आधीच वाढले आहेत. गतवर्षी सूर्यफूल तेलाचा भाव १५७ रुपये होता, आज त्याचा भाव १७० रुपये किलो आहे.
शेंगदाणा तेलाचे भाव १८० रुपये होते आज त्याचा भाव १९० रुपये आहे. सोयाबीन तेलाचे दर मात्र थोडेसे घटले आहेत. सोयातेलाचे भाव १४८ रुपये होते आज त्याचा भाव १४५ रुपये आहे.
पामतेलाची किंमत १३४ रुपये होती आज त्याचा भाव १४५ रुपये आहे. दरवाढीमुळे सामान्य ग्राहक चिंतेत आहेत. सणासुदीत नेहमीच घरगुती खरेदी वाढते. त्यातच दरवाढ झाल्यास बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की जागतिक बाजारातील चढउतार, आयात खर्च वाढ आणि देशांतर्गत उत्पादनातील घट यामुळे दर स्थिर राहणे अवघड झाले आहे.
सरकारकडून कर सवलत किंवा तातडीच्या उपाययोजना न झाल्यास आगामी आठवड्यांत खाद्यतेलाचे दर अजून भडकण्याची शक्यता व्यापाऱ्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.