Elcid Investment : एका दिवसात कोट्यधीश करणारा शेअर आता गुंतवणूकदारांना करतोय गरीब

Tejas B Shelar
Published:

Elcid Investment Share Price : शेअर बाजारातील चढ-उतार हे अनिश्चित असतात, आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे Elcid Investment Limited. काही महिन्यांपूर्वीच देशातील सर्वात महागडा शेअर ठरलेला हा स्टॉक आता गुंतवणूकदारांना मोठं नुकसान करून देत आहे. अवघ्या तीन महिन्यांतच या शेअरने तब्बल २ लाख रुपयांची घसरण नोंदवली आहे.

घसरणीचा प्रवास

काही महिन्यांपूर्वी Elcid Investment शेअरने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवण्याचा संधी दिली होती. हा शेअर MRF स्टॉकला मागे टाकत सर्वात महागडा स्टॉक ठरला होता. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये ३.३२ लाख रुपयांवर पोहोचलेला हा शेअर आता फक्त १.२८ लाख रुपयांवर घसरला आहे. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी हा शेअर ३,३२,३९९.९५ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता, पण अवघ्या काही महिन्यांत त्यात तब्बल २.०२ लाख रुपयांची घसरण झाली आहे.

सोमवारी Elcid Investment शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली. एका दिवसातच हा शेअर ४,८३३ रुपयांनी घसरला. कामकाजादरम्यान तो १,२७,४५० रुपयांवर पोहोचला. गेल्या एका महिन्यातच शेअरमध्ये ३२.६०% म्हणजे तब्बल ६१,९२५ रुपयांची घसरण झाली आहे. जर मागील सहा महिन्यांचा विचार केला, तर ही घसरण ४५.८२% म्हणजे १.०८ लाख रुपये इतकी झाली आहे.

एका दिवसात विक्रमी वाढ 

Elcid Investment मध्ये काही महिन्यांपूर्वी झालेली वाढही ऐकण्यासारखी होती. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी या शेअरमध्ये एका दिवसात ६६९२५३५% वाढ झाली होती. मुंबई शेअर बाजारात झालेल्या स्पेशल कॉल ऑक्शननंतर शेअर्समध्ये मोठी उसळी घेतली गेली.या प्रचंड वाढीनंतर, Elcid Investment ने MRF ला मागे टाकून देशातील सर्वात महागडा शेअर होण्याचा मान मिळवला. मात्र, या तेजीनंतर आता हा शेअर सातत्याने घसरत आहे.

धोक्याची घंटा ?

Elcid Investment शेअरने काही महिन्यांपूर्वी दिलेला परतावा आणि आता होत असलेली मोठी घसरण पाहता, हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठ्या जोखमीचे ठरत आहेत. अनेक गुंतवणूकदारांनी यात मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले होते, मात्र आता झालेल्या घसरणीमुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. विशेषत अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी हा मोठा धक्का आहे. मात्र, लाँग टर्म गुंतवणूकदारांनी या शेअरच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

धोकादायक गुंतवणूक

Elcid Investment हा शेअर बाजारातील जोखमीचे स्वरूप दाखवणारे उत्तम उदाहरण आहे. काही महिन्यांपूर्वी या शेअरने अनेकांना श्रीमंत बनवले, पण त्याच वेगाने घसरण झाल्याने गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत.गुंतवणूक करण्यापूर्वी शेअरच्या ट्रेंड आणि कंपनीच्या मूलभूत आर्थिक स्थितीचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा मोठ्या चढ-उतारांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागू शकतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe