सध्या महागड्या विजेमुळे जनता त्रस्त आहे. अशा वेळी केंद्र सरकार एका नवा फॉर्म्युला आणण्याच्या विचारात आहे. तो अमलात आणल्यास विजेचे बिल सुमारे २० टक्क्यांनी घटू शकते.
हा फॉर्म्युला पिक अवर अर्थात सर्वाधिक वीजवापराच्या तासांवर ठरणार आहे. ऊर्जा मंत्रालय लवकर वीज वापराबाबत नवे नियम लागू करणार आहे.
नविनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नियम आणले जात आहेत. त्यानुसार, दिवसा वीज २० टक्के स्वस्त, तर पिक अवरमध्ये २० टक्के महाग राहील.
पिक अवर्स कोणते?
■पिक अवर्समध्ये विजेची मागणी वाढते. त्यामुळे ग्रिडवर ताण वाढतो. सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ९ हे तास पिक अवर्स म्हणून गृहीत धरले जाणार आहेत.
■सकाळी लोकांना कामावर जाण्याची लगबग असते. तर सायंकाळच्या तासांमध्ये लोक घरी येतात आणि एसी, पंखे किंवा टीव्हीचा वापर वाढतो.
कधीपासून होणार नवे नियम लागू?
व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी एप्रिल २०२४ पासून हे नियम लागू होणार आहेत. त्याच्या वर्षभरानंतर कृषी क्षेत्र वगळता इतर ग्राहकांसाठी हे नियम लागू होतील.
दिवसा वापरा सौरऊर्जा
■सौरऊर्जा स्वस्त आहे. त्यामुळे दिवसा या ऊर्जेचा जास्त वापर करता येईल. परिणामी दिवसा विजेचे दर कमी असतील. इतर ऊर्जा निर्मितीसाठी खर्च जास्त येतो. त्यामुळे ती महाग असते. • आर. के. सिंह, ऊर्जामंत्री