EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने 2026 पासून पीएफ पैसे काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला असून आता ऑनलाइन क्लेम केल्यास सरासरी अवघ्या आठ दिवसांत रक्कम थेट बँक खात्यात जमा होत आहे.
केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याआधी पीएफ काढण्यासाठी अनेक आठवडे, तर कधी कधी महिन्यांचा कालावधी लागत होता. मात्र डिजिटल प्रणाली, ऑटोमेशन आणि आधार-आधारित पडताळणीमुळे हा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

पूर्वी पीएफ काढताना कागदपत्रांची तपासणी, नियोक्त्याची मंजुरी आणि मॅन्युअल प्रक्रिया यामुळे मोठा विलंब होत असे. अनेक कर्मचाऱ्यांना तातडीच्या आर्थिक गरजांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत होता.
मात्र आता EPFO ने प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केल्यामुळे क्लेम सबमिट झाल्यानंतर तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासला जातो आणि साधारण आठ दिवसांत रक्कम खात्यात जमा होते.
ही सुविधा विशेषतः नोकरी सोडलेले, नोकरी बदललेले किंवा तातडीने पीएफ काढण्याची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
मात्र यासाठी UAN ॲक्टिव्ह असणं, आधार व बँक खाते EPF खात्याशी लिंक असणं आणि KYC पूर्ण असणं आवश्यक आहे.
EPFO ने सदस्यांची माहिती दुरुस्त करणं सोपं व्हावं यासाठी ‘सिंपल जॉइंट डिक्लेरेशन’ प्रक्रिया सुरू केली आहे. जर EPF खाते आधारशी लिंक असेल आणि KYC अपडेट असेल, तर काही प्रकरणांमध्ये नियोक्त्याच्या मंजुरीशिवायही ऑनलाइन क्लेम सेटल होऊ शकतो.
तसेच फेस ऑथेंटिकेशनद्वारे UAN तयार व सक्रिय करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
डिजिटल सुधारणांचा परिणाम क्लेम सेटलमेंटच्या आकडेवारीत स्पष्टपणे दिसून येतो. 2023-24 मध्ये 5.98 कोटी क्लेम सेटल झाले होते, तर 2024-25 मध्ये हा आकडा 7.70 कोटींवर पोहोचला.
2025-26 मध्ये 23 जानेवारीपर्यंत तब्बल 8.53 कोटी क्लेम सेटल झाले आहेत. मेंबर प्रोफाइल दुरुस्तीच्या ऑनलाइन विनंत्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे.
EPFO 2.0 अंतर्गत युनिफाइड पोर्टल आणि फील्ड ऑफिस अॅप्लिकेशनमुळे क्लेम, KYC, पेन्शन पेमेंट आणि नियोक्त्यांच्या फाइलिंग प्रक्रिया अधिक सोप्या झाल्या आहेत.
भविष्यात UPI द्वारे पीएफ काढण्यासारख्या सुविधा येण्याची शक्यता असून, सध्या आठ दिवसांत पीएफ मिळणं हेच लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठं यश मानलं जात आहे.













