EPFO Rule: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने EPFO 3.0 ही नवीन डिजिटल सेवा सुरू केलेली आहे. परंतु ही सेवा सुरू करण्यासाठी पुढील वर्षी जानेवारी पर्यंत उशीर लागण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. ईपीएफओच्या सदस्यांसाठी ही सेवा अतिशय महत्त्वाचे असून या माध्यमातून कर्मचाऱ्यांना त्यांचा पीएफचा पैसा एटीएम मधून काढता येणार आहे. परंतु आता ही सेवा सुरू होण्याचा मुहूर्त लांबल्यामुळे अजून यासाठी प्रतीक्षा करावी लागेल की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मार्च 2025 मध्ये केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले होते की,EPFO 3.0 अंतर्गत ईपीएफ प्रणाली बँके इतकी सोपी केली जाईल आणि एटीएम मधून पीएफचे पैसे काढण्याची सुविधा दिली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार एटीएम मधून पीएफ काढणे शक्य करण्याकरिता ज्या काही आवश्यक आयटी पायाभूत सुविधा आहेत त्या सध्या तयार आहेत. यासंबंधी १० ते ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सीबीटी बैठकीत पद्धती आणि इतर ऑपरेशनल तपशिलांवर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एटीएम आणि यूपीआय मधून पीएफचे पैसे कसे काढावे?
या नवीन प्रक्रियेच्या माध्यमातून ईपीएफओ त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या पीएफ खात्याशी जोडलेले एक विशेष एटीएम कार्ड जारी करणार आहे. या कार्डचा वापर करून सदस्यांना त्यांची पीएफचे पैसे थेट एटीएम मशीन मधून काढता येणार आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर सदस्यांना यूपीआयचा वापर करून पीएफचे पैसे काढायचे असतील तर त्याकरिता संबंधित व्यक्तीला त्याचे पीएफ खाते यूपीआयशी लिंक करणे गरजेचे राहिल व त्यानंतरच सदस्यांना त्यांचा पीएफचा पैसा त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करता येणार आहे.
EPFO 3.0 अंतर्गत काय होतील बदल?
या सुधारणेमुळे आता पीएफ क्लेमची पूर्तता प्रक्रिया अतिशय सुलभ होणार असून दावे नाकारण्याशी संबंधित तक्रारी कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. इतकेच नाहीतर ईपीएफओने ऑनलाइन क्लेम दाखल करताना चेक किंवा प्रमाणीत बँक पासबुकचा फोटो अपलोड करण्याची आवश्यकता आता काढून टाकली आहे. महत्वाचे म्हणजे आता बँक खाते UAN नंबरशी लिंक करण्याकरिता बँक पडताळणी नंतर नियोक्त्याच्या मंजुरीची जी काही आवश्यकता होती ती देखील आता काढून टाकण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहता या सुविधेमुळे आता पीएफ काढणे आणि त्यासंबंधीच्या अनेक प्रक्रिया सुलभ होणार आहे.