High Risk Penny Stock:- आज शेअर बाजारात जेन्सोल इंजिनिअरिंगच्या शेअर्सनी पुन्हा एकदा घसरणीची नोंद केली. कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांमुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. बुधवारी कंपनीचा शेअर २ टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये गेला आणि इंट्राडेमध्ये ५१.४५ रुपयांवर येऊन थांबला. एकेकाळी सुमारे ७७८ रुपये पर्यंत गेलेला हा शेअर, आता अवघ्या काही महिन्यांत ९४ टक्क्यांनी गडगडला आहे.
या परिस्थिती मागील कारणे काय?
कंपनीच्या पतनाची खरी सुरुवात झाली ती कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील ढिसाळपणा समोर आल्यानंतर. सरकारने याची गंभीर दखल घेतली आणि कंपनीविरोधात कारवाईचा बडगा उगारला. अहमदाबादमधील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) नुकताच मोठा निर्णय घेतला. कंपनी, तिचे प्रवर्तक आणि संबंधित इतर ३४ संस्थांची बँक खाती आणि लॉकर गोठवण्याचे आदेश दिले गेले. यामागचं कारण म्हणजे कंपनीने नियमित व्यवहाराच्या नावाखाली निधी वळवणं, बनावट नोंदी तयार करणं आणि मालमत्तांची दिशाभूल करणारी विक्री हे सगळं एका संगठित पद्धतीने केल्याचा आरोप आहे.

या प्रकाराची व्याप्ती किती गंभीर आहे, हे यावरून समजतं की कारवाई केवळ एनसीएलटीपुरती मर्यादित राहिलेली नाही. दिल्लीतील कर्ज वसुली न्यायाधिकरणाने (DRT) कंपनीच्या विटा-तोफांपासून ते इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यापर्यंत सर्वच मालमत्तेवर लक्ष केंद्रित केलं आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) उपकंपनीसाठी घेतलेल्या जवळपास ९७५ कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरवापर झाल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात आता एक-दोन नव्हे, तर SFIO, SEBI, RBI, आयकर विभाग आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अशा अनेक मोठ्या संस्था एकत्र येऊन तपास करत आहेत. इतक्या मोठ्या पातळीवर सरकारने लक्ष दिलं असल्याने, हा विषय ‘सार्वजनिक हिताचा’ ठरवण्यात आला आहे.
पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ३ जून २०२५ या दिवशी नियमित एनसीएलटी खंडपीठात पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत, न्यायालयाने सर्व प्रतिवादींना एक आदेश दिला आहे. जगभरात कुठेही असलेल्या त्यांच्या स्थावर, जंगम, मूर्त किंवा अमूर्त मालमत्तांची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. यातील कोणतीही मालमत्ता विकण्याचा, गहाण ठेवण्याचा किंवा कुणाला भेट देण्याचा प्रयत्न झाला, तर तो न्यायालयाचा अवमान मानला जाईल.