Gold Loan : दैनंदिन आयुष्यात कधीही अनपेक्षित खर्च उभा राहू शकतो. हॉस्पिटलचं बिल, मुलांचं शिक्षण, घरगुती गरज किंवा व्यवसायातील अचानक आलेली अडचण-अशा वेळी हाताशी रोख रक्कम नसली तरी घरात जपून ठेवलेलं सोनं मोठा आधार ठरू शकतं. सोन्यावर कर्ज (Gold Loan) हा सन्मानाने, जलद आणि तुलनेने कमी व्याजदरात मिळणारा आर्थिक पर्याय मानला जातो.
सोन्यावर कर्ज देताना बँका आणि वित्तसंस्था काही ठराविक नियम पाळतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे Loan to Value (LTV). रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, सोन्याच्या सध्याच्या बाजारमूल्याच्या जास्तीत जास्त 75 टक्क्यांपर्यंत कर्ज दिलं जाऊ शकतं. म्हणजेच, तुमच्या सोन्याची किंमत जर 1 लाख रुपये असेल, तर बँक सुमारे 75 हजार रुपयांपर्यंत कर्ज देईल.

आता प्रश्न येतो-10 ग्रॅम सोन्यावर किती कर्ज मिळेल? सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला सुमारे 1.30 लाख रुपये आहे. मात्र, बहुतेक दागिने 22 कॅरेटचे असतात. 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 1.24 लाख रुपये धरली, तर त्याच्या 75 टक्के LTV नुसार तुम्हाला साधारण 90,000 ते 93,000 रुपये कर्ज मिळू शकतं. दागिन्यांमध्ये खडे किंवा हिरे असतील, तर त्यांचं वजन वजा करून निव्वळ सोन्याच्या वजनावरच कर्ज दिलं जातं.
व्याजदर आणि परतफेडीचे पर्याय हा गोल्ड लोनचा आणखी एक फायदा आहे. वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत गोल्ड लोनवर व्याज कमी असतं. बँकांमध्ये साधारण 8 ते 12 टक्के, तर काही वित्तसंस्थांमध्ये 18 टक्क्यांपर्यंत व्याज आकारलं जातं. ग्राहकांना EMI भरण्याचा पर्याय असतो, तसेच काही ठिकाणी दरमहा फक्त व्याज भरून मुद्दल शेवटी फेडण्याची (Bullet Repayment) सुविधाही मिळते.
कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दागिन्यांचे मेकिंग चार्जेस किंवा GST कर्जात धरले जात नाहीत. हे सिक्युअर्ड लोन असल्यामुळे सिबिल स्कोअर कमी असला तरी कर्ज सहज मिळतं. मात्र, वेळेवर व्याज किंवा कर्जफेड न केल्यास बँक सोनं लिलावात काढू शकते.
सध्याच्या वाढलेल्या सोन्याच्या भावामुळे, 10 ग्रॅम सोन्यावर 85,000 ते 95,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. कमी कागदपत्रे, जलद प्रक्रिया आणि तुलनेने कमी व्याजदर यामुळे संकटकाळात गोल्ड लोन हा एक स्मार्ट आणि विश्वासार्ह पर्याय ठरत आहे.













