Gold Matket:- भारतामध्ये सणासुदीच्या कालावधीमध्ये तसेच लग्न समारंभ इत्यादी प्रसंगी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करण्याची परंपरा किंवा ट्रेंड असल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु सध्या जर आपण सोन्याचे दर बघितले तर ते उच्चांकी पातळीवर असून प्रत्येकाला आता सोने खरेदी करता येणे आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे राहिलेले नाही. 24 कॅरेट सोन्याचा दर सध्या एक लाख दहा हजाराच्या पुढे गेला असल्यामुळे सोन्याची खरेदी आता एक स्वप्नच राहणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु या कालावधीत मात्र बरेच लोक आता 18 कॅरेट सोन्याच्या खरेदीकडे वळताना दिसून येत आहेत. कारण 18 कॅरेट सोने हे बजेटमध्ये मिळू शकते व त्यामुळे 24 किंवा 22 कॅरेट ऐवजी आता 18 कॅरेट सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
18 कॅरेट सोन्यामध्ये कुठले धातू मिसळले असतात?
18 कॅरेट सोन्याची शुद्धता बघितली तर ती साधारणपणे 75 टक्के इतकी असते. उर्वरित 25 टक्क्यांमध्ये तांबे, झिंक आणि चांदी सारख्या धातूंचा समावेश केलेला असतो. यामुळे या सोन्याला अधिक टिकाऊपणा तर मिळतोच परंतु अनेक प्रकारच्या छटा देखील यामध्ये आपल्याला मिळवता येतात. चांदी मिसळल्यामुळे हे सोने अधिक पांढरे आणि चमकदार दिसते तर तांबे असल्याने या सोन्यात एक प्रकारची लालसर चमक पाहायला मिळते. 18 कॅरेट सोन्यापासून प्रामुख्याने बांगड्या तसेच अंगठ्या व झुमके, नेकलेस आणि लग्नासाठी लागणारे आवश्यक दागिने बनवता येऊ शकतात. महिला वर्गाला जर दररोज वापराकरिता हलके दागिने घ्यायचे असतील तर त्यासाठी देखील 18 कॅरेटचे सोन्याचे दागिने फायद्याचे ठरतात. 24 कॅरेट सोन्यापेक्षा हे किमतीने देखील खूप स्वस्तात मिळते व त्यामुळे दागिने खरेदी करण्याची महिला वर्गाची इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच टिकाऊ असल्यामुळे दररोज जरी दागिन्यांचा वापर केला तरी त्यामध्ये कुठलाही प्रकारची खराबी येत नाही.














