Gold Rate : सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरे तर दीपोत्सवाच्या काळात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत असते. यंदाही दीपोत्सवात सोन्याची आणि चांदीची प्रचंड खरेदी होईल. पण सध्या स्थितीला सोन्याचे भाव रेकॉर्ड हायवर आहेत. अशातच आता हा पिवळा धातू येत्या काळात घसरू शकतो असा अंदाज समोर आलाय.
किंमती गगनाला भिडल्या असतानाच याच्या किमतीमध्ये येत्या काळात 35 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याचा अंदाज समोर येतोय. गेल्या एका वर्षात सोन्याच्या दरात तब्बल 61 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे शेअर, बाँड आणि इतर गुंतवणुकीच्या साधनांच्या तुलनेत सोनं सर्वाधिक परतावा देणारा पर्याय ठरला आहे.

मात्र, तज्ज्ञांच्या मते ही तेजी जास्त काळ टिकणार नाही आणि लवकरच सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण होऊ शकते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट दर 4,225 डॉलर प्रति औंसच्या आसपास असून, हा दर इतिहासातील सर्वोच्च स्तराजवळ आहे.
डॉलरची घसरण, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि वाढते भू-राजकीय तणाव या कारणांमुळे गुंतवणूकदार सुरक्षित संपत्ती म्हणून सोन्याकडे वळत आहेत. तथापि, तज्ज्ञांचा अंदाज आहे की ही तेजी तात्पुरती ठरू शकते. ANZ बँकेच्या अहवालानुसार, 2026 च्या जूनपर्यंत सोन्याचे दर 4,600 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात.
मात्र त्यानंतर बाजारात मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. अहवालात इशारा देण्यात आला आहे की, जर यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले किंवा अमेरिकन अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत राहिली, तर सोन्याच्या किंमतींवर दबाव येऊ शकतो.
भारतीय बाजारातही सोन्याच्या किंमतीत 30 ते 35 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच, सध्या लाखाच्या वर गेलेले दर सुमारे 77,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. चांदीच्या दरातही जवळपास 50 टक्के घसरण होऊन भाव 77,450 रुपयांपर्यंत येऊ शकतात.
गुंतवणूकदारांसाठी सध्या प्रश्न असा आहे की, या उच्चांकावर सोनं विकावं की ठेवावं. तज्ज्ञांचे मत आहे की, पुढील काही महिने बाजारातील अस्थिरतेवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचा विचार करणे अधिक शहाणपणाचे ठरेल. यामुळे सोन्यात गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.