Gold Hallmark:- भारतात सोन्याला नेहमीच मोठे महत्त्व दिले गेले आहे. आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी सोन्याची गुंतवणूक केली जाते. अडचणीच्या वेळी सोनं विकून तात्काळ पैसे उभे करता येतात. त्यामुळेच अनेकांच्या घरात जुने दागिने साठवलेले असतात.
सध्या सोन्याचा भाव सतत वाढत असल्याने जुने दागिने विकण्याचा किंवा त्यांना नवीन डिझाइनमध्ये बदलण्याचा विचार केला जातो. मात्र जुनं सोनं विकताना किंवा दागिने मोडताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.
![gold](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/zgg.jpg)
जुने सोने विकताना या गोष्टींची काळजी घ्या
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉलमार्किंग. जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग नसल्यामुळे त्याच्या शुद्धतेबाबत शंका असते. पूर्वी हॉलमार्किंग अनिवार्य नव्हते.त्यामुळे अनेक जुन्या दागिन्यांवर हे निशाण आढळत नाही.
जर तुम्हाला तुमचे दागिने विकायचे असतील किंवा नवीन डिझाइनमध्ये बदलायचे असतील तर आधी त्यावर हॉलमार्किंग करून घ्यावे. हॉलमार्किंग केल्याने दागिन्यांतील सोन्याचे कॅरेट स्पष्ट होते आणि त्यामुळे तुम्हाला योग्य किंमत मिळते.
हॉलमार्किंग महत्त्वाचे
केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून सहा अंकी हॉलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) नंबर अनिवार्य केला आहे. हा क्रमांक असलेल्या दागिन्यांची शुद्धता भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे प्रमाणित केली जाते. हॉलमार्किंगमुळे सोन्याच्या शुद्धतेबद्दल कोणतीही शंका राहत नाही. 22 कॅरेटच्या सोन्यात 91.66% सोनं असतं,
18 कॅरेटमध्ये 75%, तर 14 कॅरेटमध्ये 58.3% सोनं असतं. हॉलमार्किंग झालेल्या दागिन्यांवर 22 कॅरेटसाठी 916, 18 कॅरेटसाठी 750, आणि 14 कॅरेटसाठी 585 असा क्रमांक असतो. त्यामुळे सोनं विकताना किंवा बदलताना योग्य हॉलमार्किंग आहे की नाही, हे तपासणे गरजेचे आहे.
जर तुमच्या जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग नसेल तर ते मिळवण्यासाठी BIS सेंटरमध्ये जावे लागेल. BIS च्या अधिकृत वेबसाईटवर तुमच्या शहरातील हॉलमार्किंग केंद्राचा पत्ता शोधता येतो.
या केंद्रांमध्ये विशेष मशीनच्या साहाय्याने सोन्याची तपासणी केली जाते. या प्रक्रियेमध्ये तीन स्तरांवर सोन्याची शुद्धता तपासली जाते आणि त्यानंतर त्यावर अधिकृत हॉलमार्क लावला जातो. जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करण्यासाठी प्रति दागिना फक्त 45 रुपये शुल्क आकारले जाते.
सोनं विकताना तुम्ही कोणत्या सोनाराकडे विकता याकडे विशेष लक्ष द्या. काही विक्रेते सोन्याच्या शुद्धतेवर संशय घेत किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आधीच हॉलमार्किंग करून घेतल्यास तुम्ही योग्य बाजारमूल्यानुसार तुमच्या दागिन्याची किंमत ठरवू शकता. तसेच एकाच ठिकाणी विकण्याऐवजी वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून किंमत विचारून सर्वात चांगला सौदा निवडावा.
जुनं सोनं विकताना किंवा त्याचे नवीन दागिने बनवताना हॉलमार्किंग, सोन्याचे वजन आणि बाजारातील दर याचा विचार करून निर्णय घ्या. योग्य माहिती आणि काळजी घेतल्यास तुम्ही फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकता आणि तुमच्या सोन्याची योग्य किंमत मिळवू शकता.