सोनं-चांदीचे दर गगनाला! दागिने खरेदी आवाक्याबाहेर, गुंतवणूकदारांचा शेअर बाजार व ETF कडे कल

Published on -

Gold Silver Rate : सोनं आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठल्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी दागिने खरेदी करणे जवळपास अशक्य झाले आहे. केडिया अॅडव्हायझरीने दिलेल्या माहितीनुसार, MCX वर सोन्याचा दर पावणे दोन लाख रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर तब्बल ४ लाख रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

यामध्ये सराफ बाजारात GST, मेकिंग चार्ज आणि इतर करांची भर पडल्यास प्रत्यक्ष खरेदी आणखी महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी सध्या तरी दागिने खरेदीचा विचार बाजूला ठेवलेला दिसतो.

२९ जानेवारीच्या सकाळी सोन्याच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १,७५,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास पोहोचला आहे.

जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे. डॉलर गेल्या चार वर्षांतील नीचांकी पातळीवर आल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवला आहे.

अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदर ३.५० ते ३.७५ टक्के या मर्यादेत स्थिर ठेवले आहेत. अर्थव्यवस्था तुलनेने मजबूत असली, तरी महागाईचा धोका कायम असल्याने तातडीने दरकपात न करण्याचे संकेत देण्यात आले.

या निर्णयामुळे सोन्यातील तेजी आणखी वाढली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ झाली असून औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीला मोठा फायदा मिळत आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे दर उच्च पातळीवर कायम आहेत. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा दर १,५३,३१० रुपये, तर २४ कॅरेटचा दर १,६७,२४० रुपये आहे. मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबादमध्येही याच दरांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत.

जागतिक विश्लेषकांच्या मते, सोन्यातील ही तेजी लवकर थांबण्याची चिन्हे नाहीत. ‘सोसायट जनरल’ने वर्षअखेरीस सोन्याचा दर ६,००० डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर ‘मॉर्गन स्टेनली’ने ही किंमत ५,७०० डॉलरपर्यंत पोहोचू शकते असे म्हटले आहे.

वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचा कल आता दागिन्यांपेक्षा शेअर बाजार, ETF आणि म्युच्युअल फंडकडे वळत असून, गेल्या वर्षभरात सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News