१० मार्च २०२५ छत्रपती संभाजीनगर : सोन्यातील गुंतवणुकीला पूर्वीपासून सुरक्षित मानले जाते. तंत्रज्ञान क्रांतीने गुंतवणुकीचे अनेक पर्याय उदयाला येत असले तरी विश्वसनीयतेमुळे सोन्यातील गुंतवणूक आजही बावनकशी आहे. फार दूरचा नाही, गेल्या दशकाचा विचार केला तरी सोन्याने तिपटीहून अधिक परतावा दिल्याचे दिसते. २०१५ मध्ये भाव २६३४. ३० रुपये प्रतिग्रॅम होता. तो आता ८६९७ रुपये प्रतिग्रॅम आहे. म्हणजे दहा वर्षांपूर्वी तुम्ही एक लाख रुपये सोन्यात गुंतवले असते तर तुम्ही आता तीन लाखांहून अधिक रुपयांचे धनी असता.
सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. गेल्या दहा वर्षात सोन्याने तब्बल २१५. १९ टक्के परतावा दिला आहे. हे प्रमाण वार्षिक २१.५२ टक्क्यांहून अधिक आहे.तुम्ही मुदत ठेव ठेवली असती तर तुम्हाला जास्तीत जास्त साडेसात टक्के किंवा त्याहून किंचित अधिक व्याज मिळाले असते. सोन्याने त्यापेक्षा कितीतरी अधिक लाभ गुंतवणूकदारांच्या पदरात टाकला आहे.

भारतीयांना लागते वार्षिक ८०० टन सोने
भारत हा सोन्याचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे. १९९६ ते २००५ या काळात भारतातील विविध स्वरूपातील सोन्याची सरासरी वार्षिक मागणी ६७५ टन होती. या काळात अमेरिकेतील मागणी ४६२.५ टन तर चीनची २६२.५ टन होती. मागणी जास्त व उत्पादन कमी असल्याने भारताला सोन्याची आयात करावी लागते.सध्या ही आयात वार्षिक ८०० टन एवढी झाली आहे. भारतात दरवर्षी केवळ एक टन सोन्याचे उत्पादन होते. गेल्या वीस वर्षांत भारतात सोन्याची मागणी जवळपास १२५ टनांनी वाढली आहे.
२०३५ मध्ये तीन लाख १५ हजार रुपये तोळा ?
१९२५ पासून १९६५ पर्यंत सोन्याचा भाव दर दहा वर्षांनी जास्तीत जास्त दुप्पट होत असे.मात्र त्यानंतरच्या दशकात त्याच्या दरात झपाट्याने वाढ सुरू झाली. २००५ नंतरच्या दशकात तर त्याची झेप आणखी उत्तुंग झाली. २००५ मध्ये सात हजार असलेला भाव २०१५ मध्ये तब्बल २६ हजार ३४३ रुपयांवर पोहोचला.वाढीचा हा झपाटा पुढच्या दशकातही (२०१५ २ ते २०२५) कायम राहिल्याचे दिसते. हाच आलेख पुढे सुरू राहील असे मानले तर सोने २०३५ मध्ये तीन लाख १५ हजार रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्षभरात एक लाख
वार्षिक २१.१५ टक्क्यांची वाढ पुढे कायम राहिली तर हा धातू यंदाच किंवा फार तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रति तोळा एक लाख रुपयांची पातळी गाढू शकतो. सध्या जागतिक परिस्थिती अस्थिर आहे.अनेक देशांत युद्ध आणि संघर्षाचे वातावरण असल्याने जगभरात भांडवली बाजारात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही काळापासून सोन्याच्या मागणीत पर्यायाने त्याच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसते. हा प्रवाह कायम राहिला तर सोने कदाचित वर्ष, सव्वा वर्षातच ही पातळी गाठू शकते.
१९२५ मध्ये अवघा १८.७५ रुपये भाव
१९२५ मध्ये सोन्याचा भाव १८ रुपये ७५ पैसे प्रतितोळा होता. १९३० मध्ये तो ७० पैशांनी घसरून १८ रुपये पाच पैसे झाला.त्यानंतर सोन्याने मागे वळून पाहिले. या शंभर वर्षांत जगभरात कितीतरी उलथापालथ झाली. मात्र, त्याचा दर कधीही या पातळीला परतला नाही.