FD Interest Rate : नववर्षाची सुरुवात झाली आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
खरंतर अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडीला विशेष महत्त्व मिळत आहे. याचे कारण म्हणजे देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले आहे. यामुळे एफडी करणाऱ्यांना आता चांगला परतावा मिळत आहे. गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यांसारख्या ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या निश्चितच अधिक भासते.
मात्र, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड या ठिकाणी गुंतवणूक हे जोखीमपूर्ण असते. यामुळे आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी, पोस्ट ऑफिस आणि एलआयसी मधील योजनांनाच विशेष प्राधान्य दिले जाते. जर तुम्हीही या नवीन वर्षात एफडी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी देशातील एका बड्या बँकेने खुशखबर दिली आहे.
पंजाब नॅशनल बँकेने नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच एफडीचे व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे. बँकेच्या या निर्णयामुळे एफडी करणाऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण पंजाब नॅशनल बँकेने कोणत्या कालावधीच्या एफडीसाठी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि याची अंमलबजावणी नेमकी केव्हा होणार याविषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वाढलेत FD वरील व्याजदर
मीडिया रिपोर्टनुसार PNB ने एफडीवरील व्याजात 45 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.45 टक्के वाढ केली आहे. मात्र, काही एफडी योजनेवरील व्याज दर कमी सुद्धा करण्यात आले आहे. हे नवीन दर कालपासून अर्थातच 1 जानेवारी 2024 पासून लागू झाले आहेत.
पंजाब नॅशनल बँक सामान्य नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची एफडी देते. यावर बँकेकडून 3.50% ते 7.25% पर्यंत FD व्याज दिले जात आहे. PNB बँकेने 180 दिवसांपासून 270 दिवसांसाठी सर्वसामान्यांसाठी एफडी दर 5.50 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वरील सर्वसामान्यांसाठी FD वरील व्याज 5.80 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाले आहे. बँकेने 400 दिवसांच्या एफडीवरील व्याज 6.80 टक्क्यांवरून 7.25 टक्के केले आहे. पण, बँकेने 444 दिवसांच्या FD वरील व्याज 0.45 टक्क्यांनी कमी केले आहे.
आता 444 दिवसांच्या FD वरील व्याज 6.80 टक्के करण्यात आले आहे. पूर्वी यावर ७.२५ टक्के व्याज दिले जात होते. एकंदरीत पीएनबी बँकेत एफडी करणाऱ्यांसाठी बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे तर काही लोकांना यामुळे फटका देखील बसण्याची शक्यता आहे.