Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे.
तसेच पुढल्या महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या सणाला केंद्रातील सरकारकडून तसेच राज्यातील सरकारकडून कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील बोनस मिळाला आहे.

अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना देखील बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय राज्य सरकारकडून दरवर्षी विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना बिगर व्याजी सण अग्रिम दिला जातो. ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार असल्याने यंदाही या संदर्भात चर्चांना वेग आला आहे.
दिवाळी, रमजान, आंबेडकर जयंती आदी सणांच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना अग्रिम दिला जातो, ज्यामुळे सणासुदीच्या काळातील आवश्यक खर्च भागविण्यास मोठी मदत होते. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सण अग्रिम म्हणून 12500 रुपये दिले जातात.
ही रक्कम पुढील दहा महिन्यांत दरमहा 1250 रुपये अशा समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल केली जाते. अग्रिम रक्कम ही पूर्णपणे व्याजमुक्त असल्याने कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होतो. त्यामुळे या सुविधेकडे अनेक कर्मचारी ‘सणासुदीच्या काळातील दिलासा’ म्हणून पाहतात.
मात्र, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सध्याची 12500 रुपयांची रक्कम अपुरी असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दिवाळी हा मोठा सण असून त्यासाठी लागणारे खर्च वाढलेले आहेत.
त्यामुळे अग्रिमाची रक्कम किमान 20000 रुपये करण्यात यावी, अशी मागणी विविध कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. या मागणीसंदर्भात कर्मचारी संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे.
आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, असेही संघटनांचे म्हणणे आहे. नक्कीच या मागणीप्रमाणे निर्णय घेतला गेला तर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पण अद्याप राज्य शासनाने याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
त्यामुळे आता या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पण जर कर्मचारी संघटनांच्या मागणी मान्य झाली तर दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव अग्रिम जमा होऊ शकतो.
कर्मचाऱ्यांना महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी सण अग्रिम वाढवणे गरजेचे असल्याचे कर्मचारी संघटनांचे मत असून, यंदाची दिवाळी ही सरकारच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे दिसत आहे.